आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱयांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना काळात आरोग्य विभागामध्ये आम्ही सर्वसामान्य रुग्णांना सेवा दिली आहे. कंत्राटी पद्धतीने काम करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र आता आम्हाला कमी करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आम्ही अडचणीत आलो असून आरोग्य विभागाने नियमित कामावर रुजू करून घ्यावे, या मागणीसाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱयांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.
कोरोनासारख्या महामारीमध्ये नर्स, लॅब टेक्नीशियन, फार्मासिस्ट, ड वर्ग कर्मचारी म्हणून काम केले. बरेच जण काम करण्यास नकार देत होते. मात्र आम्ही त्या कठीण काळात सेवा बजावली. तेंव्हा त्याचा सारासार विचार करून आम्हाला नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
पाच महिन्यापासून वेतन नाही
गेल्या पाच महिन्यांपासून आम्हाला वेतनही देण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही अडचणीत आहे. त्याचाही विचार करावा, असे या निवेदनात म्हटले आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शाम गुडशलमनी, यासीन मुल्ला, करसिद्ध बरगे, सुकन्या कांबळे, सुशांत गगने, इम्रान परेल, नागाप्पा कंबार यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.