परिचारीकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : कोरोनाकाळातील कोरोना वॉरियर्स बेरोजगार
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाकाळात रुग्णांवर आम्ही रात्रंदिवस उपचार केले आहेत. कंत्राटीपद्धतीने आम्हाला सामावून घेतले. धोका पत्करून आम्ही काम केले. मात्र त्यानंतर आम्हाला कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे आम्ही बेरोजगार झालो आहे. तेव्हा तातडीने आम्हाला कायमस्वरुपी कामावर सामावून घ्यावे, अशी मागणी कोरोना वॉरियर्स नर्सनी केली आहे.
जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. परिचारक आणि परिचारीका म्हणून पहिल्या आणि दुसऱया लाटेमध्ये जीवाची पर्वा न करता आम्ही रुग्णांवर उपचार केले. अशा आणीबाणीच्या काळात आम्ही काम केले असताना आम्हाला आता कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
कायमस्वरुपी आम्हाला नोकरीत सामावून घेतल्यास आम्ही काम करू, आम्हाला योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी शाम गुडसलमनी, कुमार हुर्कडली, विश्वनाथ गीजगण्णावर, भारती शिंत्री, बसाप्पा तिगडी, अक्षता शिवणगेकर, विनायक कर्लेकर, विजय पटगार यांच्यासह इतर परिचारीका उपस्थित होत्या.