तलाठी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन : लॅपटॉपही देण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
ग्रामीण भागात जाऊन काम करत असताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचबरोबर शहरामध्ये आल्यानंतरही आम्हाला बसण्यासाठी योग्य कार्यालय नाही, कोणत्याही मूलभूत सुविधा देण्यात येत नाहीत. त्यामुळे आम्हाला वेळोवेळी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा आमच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, या मागणीसाठी तालुक्मयातील सरकारी लेखाधिकारी (तलाठी) संघटनेने तहसीलदारांना निवेदन दिले.
आम्हाला विविध कामांसाठी लॅपटॉप आवश्यक आहे. याचबरोबर किमती मोबाईल, टॅब, झेरॉक्स मशीन आवश्यक असून या सर्व सुविधा पुरविणे महत्त्वाचे आहे. यासाठी कार्यालयही आवश्यक असून त्या कार्यालयामध्ये खुर्ची, कपाट, टेबल यासह इतर साहित्य असणे आवश्यक आहे. बऱयाच ठिकाणी कोणत्याच प्रकारचे साहित्य आम्हाला दिले जात नाही. त्यामुळे काम करणे अवघड जात आहे.
आम्ही सर्वच सरकारी कामे करत असतो. महसूल विभागातीलच असे नाही तर इतर जबाबदारी दिल्यानंतर तीदेखील आम्ही पार पाडत आहे. असे असताना आम्हाला मूलभूत सुविधा मात्र दिल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघटनेचे तालुका अध्यक्ष किरण तोरगल, अनिल कम्मार, दयानंद कुगजी, उदय खातेदार, अरिफ मुल्ला, राजशेखर पाटील, सुरेश मराठे यांच्यासह विविध गावचे तलाठी उपस्थित होते.