प्रतिनिधी / बेळगाव :
घी गल्ली येथील रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबियांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील कोविड-19 वॉर्डवर दगडफेक केले होते. सिव्हिल हॉस्पिटलसमोर उभे करण्यात आलेल्या वाहनांवर दगडफेक करुन रुग्ण वाहिका पेटविण्यात आली होती. या घटनेनंतर बिम्स् कर्मचारी हादारुन गेले आहेत. आम्हाला संरक्षण द्या, अशी मागणी करीत बुधवारी सकाळी त्यांनी निदर्शने केली.
परिचारीका, डी. ग्रुप कर्मचारी व इतर वैद्यकीय कर्मचारी गुरुवारी सकाळपासून बिम्स् कार्यालयासमोर निदर्शने सुरु केली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचारी यामध्ये भाग घेतले होते. सकाळी 10.15 वाजेपर्यंत कर्मचाऱयांची घोषणाबाजी सुरु होती. हल्लेखोरांवर कारवाई करा, आम्हाला संरक्षण द्या, अशा घोषणा दिल्या जात होत्या.
10.15 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचे बिम्स्ला आगमन झाले. धरणे धरणाऱया कर्मचाऱयांना धीर देत जिल्हा प्रशासन व बेळगावकर तुमच्या मागे आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीतही तुम्ही रुग्ण सेवा करीत आहात. याची जाण समाजाला आहे. यामुळे भविष्यात अशा घटना होणार नाहीत, यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात येईल. बुधवारी रात्रीची घटना दुर्दैवी आहे. कोणत्याही परिस्थितीत तुमच्यावर अन्याय होवू देणार नाही, अशा शब्दात त्यांनी कर्मचाऱयांना धीर दिला.
प्रशासन तुमच्या सोबत आहे. यापुढे दिवसांतून दोनवेळा बिम्स्ला भेट देवून माहिती घेणार आहोत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे बिम्स्वर ताण पडत आहे. हा ताण दूर करण्यासाठी तालुका पातळीवर कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. 700 गटांचे बिम्स् आता केवळ कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर, परिचारीका व वैद्यकीय कर्मचाऱयांनी घाबरुन जावू नये. बिम्स्वर हल्ला करणाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे. या हल्ल्यानंतर आपण स्वतः व पोलीस आयुक्त घटनास्थळी येवून पाहणी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱयांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बिम्स्चे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी कर्मचाऱयांना धीर देणाऱया जिल्हाधिकाऱयांचे आभार मानले. गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना विरुध्दची लढाई सुरु आहे. या लढाईत बिम्स् कर्मचारी आघाडीवर आहेत. ही लढाई यापुढेही सुरुच ठेवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या आश्वासनानंतर कर्मचाऱयांनी आपला संप मागे घेतला आहे.