नागपूर/प्रतिनिधी
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी माहिममध्ये भाजपा कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शिवसेना भवनासंदर्भात आक्षेपार्ह विधान केलं होतं. “आम्ही इथे आलो की यांना वाटतं शिवसेना भवन फोडायलाच आलो आहे. घाबरू नका. वेळ आली तर तेही करू”, असं प्रसाद लाड म्हणाले होते. या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. परंतु भाजपमधून यासंदर्भात कोणाचीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. पण आता भाजपमधून देवेंद्र फडणवीस यांनी या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनासंदर्भात केलेल्या विधानानंतर त्यांच्या दिलगिरी व्यक्त करणाऱ्या व्हिडीओशिवाय भाजपाकडून अधिकृत अशी भूमिका आली नव्हती. त्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तोडफोड करणं आमची संस्कृती नाही, आम्ही तोडफोड करत नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच, “आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडत नाही”, असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.