मंत्री मायकल लोबो यांनी उघड केले राजकीय गुपित : महिना अखेरीस अंतिम निर्णय : डिलायला लोबो शिवोलीतूनच लढणार
गिरीश मांद्रेकर /म्हापसा
दररोज प्रसिद्धी माध्यमांमधून आपली रोखठोक भूमिका मांडणारे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो आपल्या राजनीतीबाबत कोणता निर्णय घेतात. त्याचबरोबर ऐनवेळी मंत्री आपली कोणती भूमिका घेतात याकडे पेंद्रीय मंत्र्यापासून राज्यातील सर्व आमदारांचे तसेच राजकीय विश्लेषकांचेही लक्ष लागून राहिले आहे. मंत्री लोबो भाजप सोडतात की भाजपात राहूनच आगामी निवडणूक लढवितात याबाबत बार्देश तालुक्यातील राजकीय गोठात चर्चा होत असते. राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच आता मंत्री मायकल लोबो यांनी आपले राजकीय गुपित उघड केले असून आम्ही पती-पत्नी एकाच पक्षातून आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचे मंत्री मायकल लोबो यांनी दै. ‘तरुण भारत’शी बोलताना स्पष्ट केले.
मायकल भाजप निशाणीवर व पत्नी काँग्रेस वा अन्य पक्षावर निवडणूक लढविणार असे होणार नाही. आगामी 2022ची निवडणूक आम्ही दोघेही पत्नी-पत्नी एकाच पक्षाच्या निशाणीवर लढणार असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले. मग तो पक्ष कोणताही असो, आमचा निर्णय ठाम असल्याचे मंत्री लोबो यांनी स्पष्ट केले.
दिवाळीनंतर राजकीय हालचालींना गती
भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, गडकरी यांची भेट झाली खरी; मात्र त्यांच्याकडून आपल्यावर तसा काही दबाव वगैरे काही आला नाही. शिवोलीबाबत काहीच बोलणी झाली नाही. आपली पत्नी डिलायला लोबो शिवोलीतून निवडणूक लढविणार हे निश्चित आहे. तिला तिकीट देण्यासाठी विविध राजकीय पक्ष संपर्कातही आहे. भाजपकडे आम्ही अद्याप तिकीट मागितलेली नाही. मी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बोलेन. शिवोली मतदारसंघाबाबत निर्णय डिलायलाचा आहे. निवडणूक रणनीती ठरविण्यासाठी फडणवीस प्रत्येक आमदार मंत्र्याकडे यापूर्वी बोलले आहेत. आपण गेल्या भेटीत आपले म्हणणे त्यांच्यापर्यंत मांडले आहे. दिवाळीनंतर आता आपल्या राजकीय हालचालींना गती येईल, असे ते म्हणाले. कळंगूटबाबत आपण अद्याप निर्णय घेतला नाही. कळंगूटच्या बाबतीत आपण लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी दिवाळईनंतर जाणार आहे. आपण त्यांच्यासोबत कोपरा बैठक घेऊन त्यांना विचारणार आपण काय करावे? आणि त्यानंतरच आपण अंतिम निर्णय घेणार आहे, असे मंत्री लोबो यांनी पुढे सांगितले.
कळंगूट मतदारसंघात घेणारा कोपरा बैठका !
आपण पक्षांतर करावे की पक्षात राहूनच निवडणूक लढवावी हे आता आपल्या मतदार बांधवावर अवलंबून आहे. त्यांच्या निर्णयाचा आदर आपल्यास करावा लागणार आहे. आता पाच सहा बैठका पर्रा येथे लावणार. हडफडे नागवा येथे 12 बैठका कळंगूटमध्ये नंतर कांदोळी असे दर दिवशी प्रत्येकी तीन तीन बैठका आपण घेणार आहे. या महिन्यात सर्व बैठका संपवून महिना अखेरपर्यंत आपला निर्णय काय असेल, तो जनतेपुढे स्पष्ट करणार आहे. अशी माहिती मंत्री लोबो यांनी दिली.
मंत्री लोबोंना काँग्रेस स्वीकारेल?
मंत्री लोबो यांनी पती-पत्नी एकाच पक्षातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केल्याने ते आता भाजपशीच एकनिष्ठ राहतात की अन्य पक्षात जातात याकडे सर्वांचे डोळे लागून आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री लोबो काँग्रेसमध्ये जातात, अशी सर्वत्र चर्चा व अफवा होती. शिवाय गोव्यात आलेल्या तृणमूल पक्षानेही त्यांच्याशी संपर्क साधल्याने ते त्या पक्षाकडे वळतात हे आता येत्या महिन्याअखेर स्पष्ट होईल. काँग्रेसमधील प्रवेशास कळंगूटच्या लोकप्रतिनिधींनी लोबो यांच्या प्रवेशास आपला तीव्र विरोध दर्शविला आहे. भाजपमध्येच राहून निवडणुका लढविल्यास पक्ष पती-पत्नीला स्वीकार करणार काय? आणि तसे झाल्यास माजी आमदार तथा भाजपचे वरिष्ठ नेते दयानंद मांद्रेकर गप्प बसतील काय? असे विविध प्रश्न समोर असून अशा परिस्थितीत मंत्री मायकल लोबो नवीन कोणती राजकीय चाल खेळतात याकडे सर्वांचे डोळे लागून राहणार आहेत.