ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आम आदमी पक्षाचे माजी आमदार जरनैल सिंह यांचे निधन झाले आहे. ते 48 वर्षांचे होते. कोरोना संक्रमणा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जरनैल सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
‘दिल्लीचे माजी आमदार जरनैल सिंह यांच्या अकाली निधनाने दु:खी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. समाजासाठीच्या योगदानासाठी त्यांची नेहमीच आठवण येईल’ अशा आशयाचे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर केले आहे.
तर, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही जरनैल सिंह यांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. ते म्हणाले, दिल्ली विधानसभेतील आमचे माजी सहकारी जरनैल सिंह यांच्या निधनाची बातमी आमच्या सर्वांसाठीच दुखद आहे. 1984 च्या नरसंहारातील पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा एक बुलंद आवाज आपल्यातून निघून गेला. ईश्वर त्यांना आपल्या चरणात जागा देईल, असे सिसोदिया यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, जरनैल सिंह यांना गेल्या वर्षी हिंदू देवी-देवतांसंबंधी फेसबुकवर टिप्पणी केल्या प्रकरणी पार्टीतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आपली पोस्ट काढून टाकली होती. व ते म्हणाले होते की, ही पोस्ट त्यांनी नाही तर त्यांच्या मुलाने केली होती.
पंजाबमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीत जरनैल सिंह यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल तसेच सद्य मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याविरोधात लांबी मतदारसंघातून निवडणूक लढली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीत हरल्यानंतर त्यांची दिल्लीत पंजाब अकादमीचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.