नवी दिल्ली / वृत्तसंस्था
2022 मध्ये उत्तर प्रदेशात होणारी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा मंगळवारी केली. दिल्लीत आम आदमी पक्षाने ज्या सुविधा आणि सोयी जनतेला उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या उत्तर प्रदेशमधील जनतेलाही मिळाल्या पाहिजेत, या उद्देशाने ही निवडणूक आम्ही लढविणार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले. उत्तर प्रदेशात गलिच्छ राजकारणामुळे विकास थंडावला आहे. तेथे राजकारणातील प्रामाणिकपणा संपल्याचे दिसून येते. त्यामुळे विकासाभिमुख आणि मूल्याधारित राजकारणाची परंपरा स्थापित करण्यासाठी आम आदमी पक्षाने उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.