प्रतिनिधी / सांगली
सध्या पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. तर डिझेल देखील त्याच वाटेवर चालले आहे. कोरोना, बेरोजगारी आणि मंदी या सर्वांमुळे देशातील सर्व जनता होरपळून निघत आहे. त्यात भर म्हणून राज्य सरकार देखील आपलीच राजकीय पोळी भाजून घेत आहे. या विरोधात सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर उतरल्याशिवाय गत्यंतरच उरले नसल्याने रविवारी आम आदमी पार्टी सांगली यांच्यावतीने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पेट्रोल पंपावर चड्डी बनियान घालून जनतेच्या वतीने तीव्र आक्रोश आंदोलन करण्यात आले.
देशातील जनतेमध्ये सरकार विरोधात सध्या असंतोष गगनाला भिडला आहे. ’35 रुपये लिटर दराने पेट्रोल देणार’ असे दिवास्वप्न दाखवून हे सरकार सत्तेत आले व नोटबंदी, जीएसटीसारखे तुघलकी निर्णय घेऊन संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडेच मोडून टाकले. जातिभेद, प्रांतवाद, पाकिस्तान असे जुने मुद्दे उपटून हे सरकार सातत्याने जनतेची दिशाभूल करीत आहे. इंधवाढीसह सर्वच वस्तूंच्या महागाई विरोधात आम आदमी पार्टी सांगली यांच्या वतीने मनपा क्षेत्रातील सर्व पेट्रोल पंपावर चड्डी बनियान घालून तीव्र आक्रोश आंदोलन करण्यात आले.
यावेळी मिरज शहराध्यक्ष झोहेब मुल्ला, उपाध्यक्ष तौफिक हवालदार, सचिव निसार मुल्ला, मिरज शहर अध्यक्ष महेश चिन्नटी, परवेज पटेल, मिरज तालुका उपाध्यक्ष फय्याज सय्यद, सचिव विनोद मोरे, मिरज शहर उपाध्यक्ष रवी बनसोडे, श्रीकांत चंदनवाले, संदीप कांबळे, संभाजी मोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.