जैदपूर मतदारसंघाची काँग्रेसकडून उमेदवारी : पी.एल. पुनिया यांचे पुत्र
बाराबंकीच्या जैदपूर मतदारसंघात यंदा रंगतदार लढत दिसून येत आहे. या मतदारसंघात काँग्रेसने तनुज पुनिया यांना उमेदवारी दिली आहे. तनुज हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार पी.एल. पुनिया यांचे पुत्र आहेत. विदेशातील लाखोंचे वेतन पॅकेज सोडून तनुज हे सध्या राजकीय मैदानात उतरले आहेत.
आयआयटी रुडकीमधून इंजिनियरिंगचे शिक्षण घेणारे तनुज पुनिया यांनी विदेशातही शिक्षण घेतले आहे. कॉर्पोरेट नोकरी किंवा शासकीय सेवेत न जाता राजकारणात प्रवेश करून वडिलांचा वारसा चालविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच ते प्रियंका वड्रा यांच्या युथ टीमचे सदस्य देखील आहेत. 2017 मध्ये देखील तनुज यांनी जैदपूर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.
मागील निवडणुकीत त्यांना 81 हजारांहून अधिक मते मिळाली होती. पहिल्या निवडणुकीत पराभवानंतरही तनुज यांनी मतदारसंघ न सोडता पक्षाचे काम करण्यावर भर दिला होता. याचमुळे काँग्रेस नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास दाखवत जैदपूरची उमेदवारी तनुज यांना दिली आहे.
शेतकरी, युवा, विणकरांचा मुद्दा
तनुज पुनिया हे लोकांपर्यंत पोहोचून बेरोजगारी-महागाई-भ्रष्टाचार यासह शेतकरी आणि विणकरांचे मुद्दे उपस्थित करत आहेत. जैदपूर मतदारसंघ हा विणकर तसेच शेतकरीबहुल आहे. भाजप सरकारच्या काळात शेतकरी आणि विणकरांची स्थिती वाईट आहे. हा भाग इंटरनॅशनल स्टाइलचा दुपट्टा म्हणजेच स्टोलच्या प्रॉडक्शनसाठी ओळखला जातो. येथे सर्वाधिक स्टोल विणकर समाजाकडून तयार केले जातात. परंतु महागडी वीज आणि योग्य सवलत न मिळाल्याने विणकर त्रस्त असल्याचे पुनिया म्हणाले.
समाजवादी पक्षही लक्ष्य येथे नाराजी केवळ भाजप सरकारवर नव्हे तर समाजवादी पक्षाबद्दलही आहे. 2019 च्या पोटनिवडणुकीत सपचे गौरव कुमार विजयी झाले, परंतु त्यानंतर त्यांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. बेरोजगार तरुण-तरुणींचे दुःख मी समजतो. विजयी झाल्यावर मतदारसंघाचा विकास आणि बेरोजगारी दूर करण्यास प्राथमिकता राहणर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.