मडगावात नागरिकांची मेणबत्ती रॅली
प्रतिनिधी/ मडगाव
मेळावली येथील लोकांचा आयआयटीला विरोध असताना देखील सरकार स्थानिक लोकांचे म्हणणे ऐकून न घेता सालाझारशाहीने आयआयटीचा प्रकल्प आणू पहात आहे. त्यासाठी पोलीस बळाचा वापर केला जात असला तरी गोव्यातील जनता मेळावली ग्रामस्थांच्या मागे खंबीरपणे उभी राहणार असून हा प्रकल्प मेळावलीत होऊ दिला जाणार नसल्याचा इशारा काल गावडा, कुणबी, धनगर व वेळीप (गाकुवेध) तसेच इतर बिगर सरकारी संघटनानी मडगावात दिला.
मेळावलीतील आदिवासी बांधवांनी येथील पर्यावरणाचे रक्षण केले. पण, आज आयआयटीसाठी त्यांचेच उच्चाटन करण्याचा प्रयत्न होत आहे ही दुर्दैवी बाब आहे. आज आयआयटीला विरोध करणाऱयांना अटक करण्याचे सत्र सुरू झालेले आहे. अटक झाली तरी चालेल पण, आयआयटी विरोधातील आंदोलन थांबणार नसल्याचे श्रीमती झरिना डिकुन्हा यावेळी बोलताना म्हणाल्या.
सागर एकोस्करला निलंबीत करा
मेळावलीतील महिलेच्या छातीवर पाय ठेवणाऱया पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांना त्वरित निलंबीत करा अशी मागणी गाकुवेधचे रूपेश वेळीप यांनी केली. सरकारने विरोधकांवर गुन्हे नोंद करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांनी जे गुन्हे नोंद केले आहेत ते त्वरित मागे घ्यावे व मेळावलीत पुन्हा लोकशाही नांदावी यासाठी सहकार्य करावे तसेच मेळावलीतून आयआयटी प्रकल्प मागे घ्यावा अशी मागणी ही रूपेश वेळीप यांनी केली.
सद्या आयआयटी विरोधात सुरू असलेले आंदोलन हे केवळ मेळावली पुरते मर्यादित नाही. गोव्याच्या हिताआड प्रकल्प आणण्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. जेव्हा या ठिकाणी पोर्तुगीज राजवट होती, त्यावेळी गोव्याच्या ग्रामीण भागातील लोकांना आल्वारा पद्धतीने जमिनी दिलेल्या आहेत. त्याठिकाणी उत्पन्न घेऊन ही लोकं आपला संसार चालवितात, त्याचे आत्ता उच्चाटन करण्याचा प्रयत्न होत असून तो खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला.
मेळावली गावात सुमारे 346 कुटूंबे रहात असून एका आयआयटीमुळे त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. सरकार आयआयटी इतरत्र का स्थलांतरीत करीत नाही. मेळावलीसाठीच सरकारचा अट्टहास कशासाठी असा सवाल देखील यावेळी उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी ऍड. जॉन फर्नांडिस (केपे आदिवासी संघटना अध्यक्ष), फा. एरिमेत तसेच इतरांची भाषणे झाली.
मडगाव पालिका उद्यानाजवळ सर्व नागरिकांनी भव्य रॅली काढून मेळावलीवासियांना पाठिंबा देतानाच पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आला.