निरीक्षकांना रोखणार इराण
वृत्तसंस्था/ तेहरान
इराण आणि संयुक्त राष्ट्रसंघ आण्विक देखरेख संस्थेमधील तीन महिन्यांचा देखरेख करार शनिवारी समाप्त झाला आहे. याचमुळे इराण आता आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेला (आयएईए) स्वतःच्या आण्विक तळांची छायाचित्रे काढू देणार नसल्याचे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मुहम्मद बकर कलीबफ यांनी रविवारी म्हटले आहे.
इराण आणि 6 देशांमधील आण्विक कराराला पुनर्जीवित करण्याच्या प्रयत्नांवर यामुळे प्रभाव पडू शकतो. दुसरीकडे आयएईएचे प्रमुख देखरेखीची कालमर्यादा वाढविण्यासंबंधी इराणसोबत चर्चा करत आहेत.
22 मे रोजी तीन महिन्यांचा करार संपुष्टात आल्यावर आंतरराष्ट्रीय संस्थेला आण्विक केंद्रांमध्ये छायाचित्रे काढू देणर नसल्याचे कलीबफ यांनी सांगितले आहे. 2018 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करारातून बाहेर पडण्याचा निर्णय आणि निर्बंध लादण्यात आल्यावर इराणने कराराच्या अटींचा भंग करण्यास प्रारंभ केला होता. या कराराचा उद्देश इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखणे आहे. तर आपण अण्वस्त्रनिर्मितीचा प्रयत्न कधीच केला नसल्याचे इराणचे म्हणणे आहे. फेब्रुवारी महिन्यात आयएईए आणि इराण यांच्यात आण्विक केंद्रांच्या देखरेखीबद्दल सहमती झाली होती.