प्रतिनिधी/ वास्को
गोवा नौदल विभागाच्या गोमंतक या मुख्यालयातील नेव्ही हाऊसमध्ये नौदल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पर्यटन, बंदर, शिपींग व जलवाहतुक राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो, ऍडमिरल अरूण प्रकाश, ऍडमिरल सुरेश मेहता, ऍडमिरल करमगिर सिंग हे नौदलाचे माजी प्रमुख तसेच निवृत्त नौदल अधिकारी, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी व इतर मान्वयर उपस्थित होते.
याप्रसंगी गोवा नौदल विभागाचे ध्वजाधिकारी रिअर ऍडमिरल फिलीपोस जी पायनुमुटील यांनी गेल्या वर्षभरातील घडामोडीविषयी माहिती दिली. त्यांनी यावेळी जनतेसाठी केलेल्या सेवांवर प्रकाशझोत टाकला. तौक्ते चक्रीवादळ काळातील नौदलाचे कार्य व नौदलाने केलेल्या 55,000 हून अधिक लसीकरणाची माहिती त्यांनी दिली.
नौदलाची फ्लायपास्ट हवाई जहाजे, फास्ट इंटरसेप्टर जहाजे, चेतक हेलिकॉप्टर विमानांचे प्रदर्शन व बिटींग रिट्रीट कार्यक्रम नौदल दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. नौदल दिनानिमित्त नौदल दिनाच्या टेलिफिल्मचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच समुद्रात नांगरून ठेवलेल्या नौदलाच्या जहाजांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.