ब्राह्मोस-बराक क्षेपणास्त्रांनी सज्ज – हिंदी महासागरात वाढले बळ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय नौदलाला पहिली पीबी15 स्टेल्थ गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर प्राप्त झाली आहे. शत्रूला धडकी भरविणारी ही युद्धनौका असून यात भारताचे सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र ब्राह्मोस तसेच बराकचा अंतर्भाव करण्यात आला आहे. ही युद्धनौका शत्रूचे जहाज पाहताच स्वतःच्या डेकवरून अँटी-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्र डागू शकते. पीबी15 स्टेल्थ गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयरला आयएनएस विशाखापट्टणम नाव देण्यात आले आहे.
माझगावा डॉक शिपबिल्डर्सनी याची निर्मिती केली आहे. भारतीय नौदलाने ही विध्वंसक युद्नौका प्राप्त केल्यावर ट्विट करत याची माहिती दिली आहे. विशाखापट्टणम ही पहिली स्वदेशी पीबी15 स्टेल्थ गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहे. भारतीय नौदलाचे बळ वाढविण्यासोबतच आत्मर्भिर भारत मोहिमेला पुढे नेण्यास ही युद्धनौका कारणीभूत ठरणार आहे.
आयएनएस विशाखापट्टणमच्या निर्मितीला 12 ऑक्टोबर 2013 रोजी सुरुवात झाली होती. 31 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय नौदलाकडे ही युद्धनौका सोपविण्यात आली आहे. ही युद्धनौका 7,400 टन वजनी असून याची लांबी 535 फूट आहे. ट्विन जोर्या एम36ई गॅस टर्बाइन प्लँट, बर्जेन केव्हीएम डिझेल इंजिनकडून याला मोठी ऊर्जा प्राप्त होते.
आयएनएस विशाखापट्टणमचा कमाल वेग 56 किलोमीटर प्रतितास आहे. 26 किलोमीटर प्रतितास या वेगाने मार्गक्रमण केल्यास ही युद्धनौका 7,400 किलोमीटरचा पल्ला गाठू शकते. या युद्धनौकेवर एकाचवेळी 300 नौसैनिक राहू शकतात. यात 50 अधिकारी आणि 250 सेलर्स सामील आहेत. युद्धनौकेच्या सुरक्षेसाठी डीआरडीओकडून निर्मित इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर शक्ती ईडब्ल्यू सुइट आणि चॅफ सिस्टीम बसविण्यात आली आहे.
आयएनएस विशाखापट्टणमवर 32 अँटी-एअर बराक क्षेपणास्त्रs तैनात केली जाऊ शकतात. या क्षेपणास्त्रांचा मारक पल्ला 100 किलोमीटर आहे. तसेच यात 16 अँटी-शिप किंवा लँड अटॅक ब्राह्मोस क्षेपणास्त्रs तैनात केली जाऊ शकतात. या दोन्ही क्षेपणास्त्रांना तैनात केल्यावर ही युद्धनौका शत्रूची जहाजे किंवा विमानांवर तुटून पडू शकते.
याचबरोबर युद्धनौकेवर 76 मिलिमीटरची ओटीओ मेराला तोफ, 4 एके-603 सीआयडब्ल्यूएस गन तैनात आहे. तसेच यात 533 मिलिमीटरच्या 4 टॉरपीडो टय़ूब्स आहेत. 2 आरबीयू-6000 अँटी-सबमरीन रॉकेट लाँचरही युद्धनौकेवर आहेत. युद्धनौकेवर दोन वेस्टलॅड सी किंग किंवा एचएएल ध्रूव हेलिकॉप्टर नेले जाऊ शकते. युद्धनौकेत स्टेट ऑफ द आर्ट सेंसर बसविण्यात आले असून ते शत्रूच्या अस्त्रांचा सहजपणे थांगपत्ता लावू शकतात. तसेच बॅटल डॅमेज कंट्रोल सिस्टीम्सद्वारे युद्धादरम्यान एखाद्या हिस्स्याचे नुकसान झाल्यास पूर्ण युद्धनौकेने काम बंद करू नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
आयएनएस विशाखापट्टणममध्ये टोटल ऍटमॉस्फियरिक कंट्रोल सिस्टीम (टीएसीएस) बसविण्यात आल्याचे सांगण्यात येते. याच्या मदतीने युद्धनौकेवरील नौसैनिकांना कुठल्याही प्रकारच्या रासायनिक, जैविक किंवा आण्विक हल्ल्यापासून वाचविले जाऊ शकते.