बेंगळूर/प्रतिनिधी
आयएमए घोटाळा प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) रविवारी अटक केलेल्या माजी आमदार रोशन बेग यांना ह्रदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने गुरुवारी बेंगळूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
२८ नोव्हेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्यात आलेल्या रोशन बेग यांना परप्पन अग्रहरा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आजारी असल्याने तुरुंगातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते आणि नंतर डॉक्टरांनी जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोव्हॅस्कुलर सायन्स येथे कार्डियोलॉजिस्टचे वैद्यकीय मत घेऊन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले.
दरम्यान बेंगळूर येथील श्री जयदेव कार्डिओव्हस्कुलर सायन्सेस अँड रिसर्चचे संचालक डॉ. सी.एन. मंजुनाथ यांनी पुष्टी केली की बेग यांना ह्रदयविकाराचा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डॉ. सी. एन. मंजुनाथ यांनी सांगितले की, २०१६ मध्ये त्यांचे अँजिओग्राम झाले होते. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होत होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. तसेच आता पुन्हा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले जात आहे आणि रक्तवाहिन्यांची स्थिती तपासण्यासाठी पुन्हा अॅंजिओग्राम करून घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.