संशयित मूळचा राजस्थानमधील – हेरगिरी केल्याचा संशय
प्रतिनिधी/ बेंगळूर
पाकिस्तानमधील गुप्तचर संघटना आयएसआयच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून रविवारी बेंगळूरमधून एकाला अटक करण्यात आली आहे. जीतेंदर सिंग असे त्याचे नाव आहे. तो मूळचा राजस्थान येथील आहे, अशी माहिती बेंगळूर पोलिसांनी दिली आहे. दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स, बेंगळूर आणि केंद्रीय गुन्हे शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
बेंगळूरच्या कॉटनपेठ येथील जाली मोहल्ला येथील निवासस्थानावर छापा टाकून जीतेंदर सिंग याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. राजस्थानच्या बारमेरहून येऊन तो बेंगळूरमध्ये कपडे विक्रीचे काम करत होता. याबरोबरच पाकिस्तानमधील हॅन्डलरशी (आयएसआय) सातत्याने संपर्कात होता. व्हॉट्सऍप व्हिडीओ कॉलिंगद्वारे तो देशातील महत्त्वाची ठिकाणे, इमारती, संरक्षण सचिवालयाच्या इमारतींचे फोटो आयएसआयला पाठवत होता, अशी माहिती सुरक्षा यंत्रणेला उपलब्ध झाली आहे. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
अटकेच्या कारवाईवेळी जीतेंदर सिंग याच्याजवळ सैन्यदलाच्या जवानांसारखा गणवेश आढळून आला आहे. हे काम करण्यासाठी तो भारतीय सैन्यदलाच्या अधिकारी असल्यासारखे भासवत होता. बारमेर येथील सैन्यदलाच्या केंदाचे फोटो त्याने आयएसआयला पाठविल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली आहे. या भागातील मिलिटरी वाहनांच्या वर्दळीसंबंधीची माहितीही त्याने पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेला दिल्याचा संशय आहे.