क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
आयएसएलमध्ये आज रविवारी वास्कोतील टिळक मैदानावर हैदराबाद एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यात महत्वपूर्ण लढत होणार असून, ही लढत जिंकणारा संघ तिसरे स्थान गाठू शकेल. सध्या या दोन्ही संघांचे प्रत्येकी 15 सामन्यांतून पाच विजय, सात बरोबरी आणि तीन पराभवाने समान 22 गुण झाले आहेत. सरस गोल सरासरीमुळे हैदराबाद चौथ्या तर नॉर्थईस्ट युनायटेड पाचव्या स्थानावर आहेत.
गेल्या मोसमात या दोन संघांना तळात राहावे लागले होते. यावेळी त्यांनी कामगिरीला कलाटणी दिली असून दोन्ही संघ बाद फेरीच्या शर्यतीत आहेत. हैदराबाद गेल्या सात सामन्यांत अपराजित आहेत तर नॉर्थईस्ट युनायटेडने गेल्या पाच सामन्यांत ही कामगिरी करीत मोहिमेला कलाटणी दिली आहे.
हंगामी प्रशिक्षक खलीद जमील यांनी जानेवारीत सुत्रे हाती घेतल्यापासून नॉर्थईस्ट युनायटेडने तीन विजय व एक बरोबरी अशी कामगिरी केली आहे. नऊ सामन्यांत क्लीन शीट राखता आली नसली तरी आघाडीफळीची कामगिरी त्यांचे बलस्थान ठरली आहे. त्यांनी 21 गोल केले असून ते एफसी गोवाच्या बरोबर संयुक्त दुसऱया क्रमांकाचे आहेत.
खलीद यांची कामगिरी चांगली ठरली आहे. याचे कारण एटीके मोहन बागान, जमशेदपूर एफसी आणि मुंबई सिटी यांच्याविरूद्ध विजय मिळविणे तसेच एफसी गोवा संघाला दोन वेळा पिछाडीवर पडूनही 2-2 अशी बरोबरी साधणे सोपे नाही, असे हैदराबादचे प्रशिक्षक मान्यूएल मार्क्वेझ म्हणाले. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे खलीद हे खेळाडूंना आत्मविश्वास देतात. आम्ही आमच्या शैलीनुसार खेळलो तर अर्थातच जिंकण्यासाठी आमच्याकडे पर्याय असतील, असे मार्क्वेझ म्हणाले.
जिंकण्याची संधी वाढविण्यासाठी हैदराबादला नॉर्थईस्ट युनायटेडचा मीडफिल्डर फेडेरीको गॅलेगो याची नाकेबंदी करावी लागेल. उरुग्वेच्या या स्ट्रायकरने आतापर्यंत चार गोल केले आहेत आणि तेवढय़ाच गोलांना असिस्टही केले आहे. संघासाठी सर्वाधिक संधी त्यानेच निर्माण केल्या आहेत.
फुटबॉल खेळात वैयक्तिक कामगिरी नसते. प्रत्येक जण कसून प्रयत्न करतो. खेळाडू त्यांची कामगिरी बजावत आहेत आणि खेळाचा आनंद लुटत आहेत. अगदी प्रशिक्षकांसह प्रत्येक जण एकत्रित प्रयत्न करीत आहेत व हेच यशाचे रहस्य असल्याचे नॉर्थईस्ट युनायटेडचे प्रशिक्षक खलीद जमील म्हणाले. खलीद यांना एका गोष्टीची जाणीव असेल आणि ती म्हणजे नॉर्थईस्ट युनायटेडला दुसऱया सत्रात गोल पत्करावे लागतात. दुसरीकडे हैदराबादने त्यांचे 20 पैकी 15 गोल दुसऱया सत्रात नोंदविले आहेत.