क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी चेन्नईन एफसीचा सामना जमशेदपूर एफसी यांच्यात बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर होईल. सध्या जमशेदपूर एफसीचे 16 सामन्यांतून चार विजय, सहा बरोबरी आणि सहा पराभवाने 18 गुण तर चेन्नईन एफसीचे 16 सामन्यांतून तीन विजय, आठ बरोबरी व सहा पराभवाने 17 गुण झाले आहेत.
या स्पर्धेतील चेन्नईनची मोहिम अपेक्षेनुसार पुढे सरकलेली नाही. मागील सामन्यात त्यांना बेंगलोर एफसीविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. सामन्यात एकही गोल न करता येण्याची ही त्यांची नववी वेळ होती. चेन्नईनला गोल करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. दोन वेळच्या विजेत्या संघाला संधी निर्माण करूनही अपयश आले आहे. गेल्या सलग पाच सामन्यांत त्यांना मैदानी खेळातून गोल करता आलेला नाही.
सलग दुसऱया मोसमात बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना विजयाची नितांत गरज आहे. अनेक संघ बाद फेरीच्या शर्यतीत असल्यामुळे त्यांना तीनपेक्षा कमी गुण मिळवून चालणार नाही. चौथ्या स्थानांवरील संघापासून चेन्नईन संघ सहा गुणानी मागे आहे. त्यांचे आव्हान अवघड वाटत असले तरी आकडेवारीच्या आधारावर ते शक्य आहे. आपल्या संघाने अखेरपर्यंत संघर्ष करावा, असे आवाहान चेन्नईनचे प्रशिक्षक लॅसझ्लो यानी केले. आम्हाला अजूनही आशा आहेत. आम्ही बाद फेरीचे ध्येय सोडून देलेले नाही. जीएमसीच्या स्टेडियमवर होणारा सामना केवळ जमशेदपूरच नव्हेच तर इतर संघांसाठीही महत्त्वाचा आहे, असे लॅसझ्लो म्हणाले.
सामने जिंकण्याची क्षमता आमच्याकडे आहे, पण आम्हाला संधीचा सरस वापर करावा लागेल. आक्रमणाच्या आघाडीवरही सातत्य राखावे लागेल. इतक्या संधी निर्माण करून त्या दवडणे सामान्यपणाचे लक्षण नाही. पण आमच्या खेळाडूंच्या क्षमतेवर विश्वास आहे. आम्ही वाटचाल कायम ठेवून आमच्या शैलीचा खेळ करण्याचा प्रयत्न करून, असे लॅसझ्लो
म्हणाले. चेन्नईन एफसी हा अवघड प्रतिस्पर्धी आहे. त्यांनी नक्कीच बऱयाच संधी निर्माण केल्या आहेत, पण त्यांना शक्य तेवढी सफाई दाखविता आलेली नाही. त्यांची क्षमता आम्हाला ठाऊक आहे, असे जमशेदपूरचे प्रशिक्षक ओवेन कॉयल म्हणाले. आम्ही पुढील सामन्याकडे अंतिम फेरीप्रमाणे पाहू शकतो. आम्हाला गुण मिळवावे लागतील आणि पिछाडी कमी करावी लागेल. आघाडीवरील संघांना अर्थातच जास्त संधी असेल. आमच्यासमोर जिंकण्याचा एकमेव मार्ग आहे आणि त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि संधी असल्यास बाद फेरीतील स्थान मिळवावे लागेल, असे कॉयल म्हणाले.