क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत काल फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेली हैदराबाद एफसी आणि ओडिशा एफसी संघातील लढत 1-1 अशी बरोबरीत संपली.
मध्यंतराला हैदराबादचा संघ एक गोलने आघाडीवर होता. सामन्याच्या 13व्या मिनिटाला लिस्टन कुलासोने दिलेल्या पासवर हालीचरण नर्झारीने गोल नोंदवून हैदराबाद एफसीला आघाडीवर नेले. दुसऱया सत्रात 51व्या मिनिटाला डायगो मॉरिसियोच्या पासवर कोल आलेक्सझांडरने ओडिशा एफसीचा बरोबरीचा गोल केला. या बरोबरीने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. आता हैदराबाद एफसीचे आता 12 सामन्यांतून चार विजय, पाच बरोबरी आणि तीन पराभवाने 17 गुण झाले असून ते चौथ्या स्थनावर आहेत. शेवटच्या स्थानावर असलेल्या ओडिशा एफसीचे आता 12 सामन्यांतून एक विजय, चार बरोबरी आणि सात पराभवाने 7 गुण झाले आहेत.