काबूलच्या हल्लेखोरांचा अमेरिकेकडून खात्मा – अफगाणिस्तानात घुसून रोखठोक कारवाई
काबूल, वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेने शनिवारी पहाटे इस्लामिक स्टेटच्या तळांवर ड्रोनद्वारे बॉम्बहल्ले करत काबूलमधील हल्लेखोरांना अद्दल घडवली. या हल्ल्यात काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट घडवणाऱया सूत्रधाराचा खात्मा करण्यात आला. अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अवघ्या 48 तासांमध्ये आयएसच्या तळांवर ड्रोनहल्ला करत आपली ताकद दाखवून दिली. अफगाणिस्तानातील नांगाहार प्रांतात ड्रोनच्या मदतीने ही मोहीम पार पडली.
अफगाणिस्तानातील इस्लामिक स्टेटच्या (आयएसआयएस) तळांवर हल्ला केल्याची माहिती अमेरिकन लष्कराने शनिवारी दिली. अफगाणिस्तानच्या नांगाहार प्रांतात हा हल्ला करण्यात आला. याठिकाणी संशयित हल्लेखोर ठार झाल्याची पुष्टी अमेरिकेनेच दिली आहे. तसेच यामध्ये अन्य जीवितहानी झालेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. इस्लामिक स्टेटच्या खुरासानने काबूल विमानतळावर हल्ला केल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र या ड्रोन हल्ल्यांमुळे झालेल्या आयएसआयएसच्या नुकसानीसंबंधी पक्की माहिती समोर आली नसली तरी प्राथमिक अंदाजानुसार काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ला करणाऱयांचा खात्मा करण्यात आल्याचे अमेरिकन सेंट्रल कमांडचे कॅप्टन बिल अर्बन यांनी सांगितले.
रिपर ड्रोनद्वारे अमेरिकेचा हल्ला
‘आयएसआयएस-के’चे बहुतांश कट्टरवादी अफगाणिस्तानाच्या पूर्वेकडे असलेल्या नांगाहार प्रांतातच लपून बसले आहेत, अशी माहिती समोर आली होती. त्यानुसार अमेरिकेने पाठवलेल्या रिपर ड्रोनच्या माध्यमातून आयएसच्या तळावर हल्ला करण्यात आला. या ड्रोनने संशयिताला कारमध्येच गाठले. यावेळी त्याच्यासोबत आणखी एक इस्लामिक स्टेट कट्टरवादी उपस्थित होता. या दोघांनाही ठार करण्यात आले आहे, असे अधिकाऱयांनी सांगितले.
अमेरिकन सैन्य अजूनही सक्रिय
काबूल विमानतळावर अमेरिकेचे पाच हजार सैनिक अजूनही तैनात आहेत. अफगाणिस्तानातून बाहेर पडणाऱया लोकांना त्यांच्याकडून मदत केली जात आहे. अमेरिकन लष्कराने ‘आयएसआयएस-के’ विरोधात जोरदार मोहीम राबवली आहे. त्यानुसारच ड्रोनहल्ले करण्यात आले. या हल्ल्यात कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही. विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने मागील 20 वर्षांमध्ये अशाप्रकारे अफगाणिस्तानमध्ये केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.
काबूलमध्ये घातपाती कारवायांचा धोका कायम
अमेरिकन अधिकाऱयांनी काबूलमध्ये आणखीन एका दहशतवादी हल्ल्याची शक्मयता व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसचे प्रसारमाध्यम सचिव जेन साकी यांनी यासंबंधी सर्वांनाच सतर्क केले आहे. अफगाणमध्ये अजूनही धोका कायम असून अमेरिकन सैनिकांच्या जीवालाही धोका असल्याचे साकी यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेने 31 ऑगस्टपूर्वी आपली बचाव मोहीम संपवणार असल्याचे म्हटले आहे. मात्र अडकलेल्या नागरिकांची संख्या पाहता यामध्ये अधिक कालावधी लागण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे. आवश्यकता भासल्यास 31 ऑगस्टनंतरही मोहीम सुरु राहील, असे जो बायडेन यांनी स्पष्ट केले आहे.
काबूल स्फोट मृतांचा आकडा 170 वर
अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असलेल्या काबूल विमानतळावर गुरुवारी आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासान (आयएसआयएस-के) या संघटनेने घेतली होती. यामध्ये 170 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये 13 अमेरिकन सैनिकांचाही समावेश होता. या हल्ल्याची योजना बनवणाऱया इस्लामिक स्टेट खुरासान संघटनेच्या सदस्यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून लक्ष्य केले.