पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर ठार
ऑकलंड / वृत्तसंस्था
न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरातील न्यू लीन उपनगरात एका शॉपिंग मॉलमध्ये आयएसआयएस समर्थक दहशतवाद्याने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सहाजण जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांच्या गोळीबारात मॉलमध्ये चाकूहल्ला करणारा दहशतवादी ठार झाला आहे. हल्लेखोर मूळ श्रीलंकेचा नागरिक असून तो आयएस या दहशतवादी संघटनेचा समर्थक असल्याची माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली.
दहशतवाद्याने मॉलमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्याच्या हातात शस्त्र नव्हते. पण मॉलमधील एका दुकानामधून चाकू खरेदी केल्यानंतर दुकान मालकावरच सर्वप्रथम हल्ला केला. त्यानंतर मॉलमध्ये आणखी पाच जणांवर दहशतवाद्याने चाकूने हल्ला केला. पहिला हल्ला झाल्यानंतर मागावर असलेल्या पोलिसांनी त्याला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला. यामुळे दहशतवाद्याला चाकू घेऊन मोठा हल्ला करणे जमले नाही. पोलिसांनी घेराव घालून दहशतवाद्यावर गोळीबार केला. या गोळीबारात तो ठार झाला.
संबंधित दहशतवादी 2011 मध्ये न्यूझीलंडमध्ये आला होता. 2011 पासून तो येथेच स्थायिक झाला होता. पुढे एका प्रकरणात काही काळ तुरुंगात गेला होता. तो दहशतवादी विचारांचा समर्थक झाल्याचे लक्षात आल्यापासून पोलीस त्याच्या हालचालींवर नजर ठेवून होते.