गलवान खोऱयात चिनी सैनिकांना भिडणारे जवान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी 1,380 पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. आयटीबीपीच्या 23 जवानांना स्वातंत्र्यदिनी शौर्याच्या पोलीस पदकाने गौरविण्यात येणार आहे. मागील वर्षी मे-जून महिन्यात लडाखमध्ये चिनी सैन्याला भिडणाऱया 20 जवानांचा यात समावेश आहे.
सीमा सुरक्षेत जवानांना शुरताठी आतापर्यंत देण्यात आलेल्या पदकांचे हे सर्वात अधिक प्रमाण असल्याचे आयटीबीपीने म्हटले आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी देशाची सेवा आणि बलिदान करणाऱया जवान तसेच पोलिसांच्या सन्मानार्थ शौर्य पुरस्कार दिला जातो.
पूर्व लडाखमध्ये मागील वर्षी 15-16 जूनदरम्यान रात्री चिनी सैनिकांसोबत हिंसक झटापटीत 20 भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. पूर्व लडाखमधील चिनी सैनिकांच्या आगळीकीला भारतीय सैनिकांसोबत आयटीबीपीने चोख प्रत्युत्तर दिले होते. गलवानमध्ये चिनी सैनिकांनी दगडांनी हल्ला केला असता जवानांनी पूर्ण रात्र चिवट प्रतिकार केला होता. काही ठिकाणी आयटीबीपी जवान 17-20 तासांपर्यंत चिनी सैनिकांना भिडले होते.
यंदा 1,380 पोलीस पदकांची घोषणा झाली असून यात शौर्यासाठी 2 जणांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक (पीपीएमजी), वीरतेसाठी 628 पोलीस पदक, विशिष्ट सेवेसाठी 88 राष्ट्रपती पोलीस पदक आणि कौतुकास्पद सेवेसाठी 662 पोलीस पदक सामील आहेत.
शौर्यासाठीच्या 628 पोलीस पदकांमध्ये सर्वाधिक जम्मू-काश्मीरला 256 पुरस्कार, सीआरपीएफला 151, आयटीबीपीला 23 शौर्य पदकांनी गौरविण्यात येणार आहे. याचबरोबर ओडिशा पोलीस विभागाला 67, महाराष्ट्र पोलीस विभागाला 25 आणि छत्तीसगड पोलीस विभागाला 20 पदकांनी गौरविले जाणार आहे.