बेल्जियन प्रजातीच्या श्वानांना गलवान-सुल्तान, श्योक ही नावे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आयटीबीपीच्या कॉम्बॅट युनिट के9 मध्ये बुधवारी 16 नवे श्वान सदस्य सामील करण्यात आले आहेत. हे सर्व बेल्जियन प्रजातीचे श्वान आहेत. या श्वानांना भारतीय आणि लडाख क्षेत्रातील प्रचलित नावे देण्यात आली आहेत. गलवान खोऱयामुळे एका श्वानाला गलवान नाव देण्यात आले आहे. तर सुल्तान आणि श्योकही या युनिटमध्ये सामील आहे. यापूर्वी इंग्रजी नावे (एलिझाबेथ किंवा सीझर यासारखी ) देण्यात येत होती. लडाखच्या आव्हानात्मक स्थितीत या के9 युनिटची जबाबदारी महत्त्वाची ठरणार आहे.
आयटीबीपी तैनात असलेल्या ठिकाणांची नावे या स्क्वॉडच्या सदस्यांना दिली आहेत. तेथे तैनात असलेल्या लोकांच्या सन्मानार्थ हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती आयटीबीपीचे उपमहानिरीक्षक एस. नटराजन यांनी दिली आहे.
पंचकुला येथील आयटीबीपीच्या नॅशनल सेंटर फॉर डॉग्समध्ये या श्वानांनी जन्म घेतला होता. या श्वानांना ससोमा, दौलत, श्योक, चेन्चिनो, गलवान, अनिला, चुंग थुंग, मुखपरी, युलु, सुल्तान चुक्सू, साशेर, सिरिजल, चार्डिंग, इमिस, चिपचाप आणि रेजांग अशी नावे मिळाली आहेत.