नवी दिल्ली / वृत्तसंस्था
व्यक्तीगत प्राप्तीकर विवरणपत्र (आयटी रिटर्न) सातर करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारने वाढ केली असून 2021 चे विवरणपत्र आता 30 सप्टेंबरपर्यंत सादर करता येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) गुरुवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
कंपन्यांचे विवरणपत्र सादर करण्याच्या कालावधीतही वाढ करण्यात आली असून अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर असा ठरविण्यात आला आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीचा विचार करता ही कालावधीवाढ देण्यात आली आहे. मालकांकडून कर्मचाऱयांना दिल्या जाणाऱया अर्ज क्रमांक 16 चा कालावधीही 15 जुलैपर्यंत वाढविण्यात आला असल्याचे करविभागाने स्पष्ट केले. कर हिशेबतपासणी अहवाल (टॅक्स ऑडिट रिपोर्ट) आणि ट्रान्स्फर प्रायसिंग सर्टिफिकेट सादर करण्याचा कालावधीही वाढविण्यात आला असून तो अनुक्रमे 31 ऑक्टोबर आणि 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. तसेच विलंबाने सादर केल्या जाणाऱया विवरणपत्रांसाठी आता 31 जानेवारी 2022 हा अंतिम दिनांक असेल. अर्थसंस्थांना त्यांचे आर्थिक व्यवहार अहवाल (एसटीएफ) सादर करण्यासाठी 30 जून 2021 पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. यामुळे उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आहे.
थकबाकी असणाऱयांचा अपवाद
ज्यांच्याकडे पूर्वीच्या करांची थकबाकी आहे किंवा ज्यांचा कर टीडीएस व आगाऊ कर भरण्यातून जात नाही, तसेच ज्यांची थकबाकी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना मूळच्या दिनांकांपर्यंतच विवरणपत्र सादर करायचे आहे, असे करविभागाने स्पष्ट केले. तसे न केल्यास त्यांना मूळ अंतिम कालावधीनंतर प्रतिमहिना 1 टक्का या प्रमाणात दंड भरावा लागणार आहे.
1 एप्रिललाच नोंद
आर्थिक वर्ष 2020-2021 साठीच्या विवरण पत्र अर्जांचे नोंद 1 एप्रिललाच करण्यात आली असून तशी सूचनाही काढण्यात आली. तथापि, कोरोनाच्या स्थितीत करदात्यांची सोय व्हावी म्हणून कालावधीत वाढ करण्यात आली. गेल्या वर्षीचे विवरण पत्र अर्ज ज्या स्वरुपात होते, अधिकांश त्याच प्रकारचे अर्ज यंदाही आहेत. यामुळे त्यांना कोणतीही अडचण होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
- सर्व विवरणपत्रांना कालावधीवाढ
- व्यक्तीगत प्राप्तीकर- 30 सप्टेंबर 2021
- कंपनी प्राप्तीकर- 30 नोव्हेंबर 2021
- अर्ज 16 चे वितरण- 15 जुलै 2021
- टॅक्स ऑडिट रिपोर्ट- 31 ऑक्टोबर 2021
- ट्रान्स्फर प्रायसिंग सर्टिफिकेट- 30 नोव्हेंबर 2021
- विलंबाने सादरीकरण- 31 जानेवारी 2022
- अर्थसंस्थांचे एसटीएफ- 30 जून 2021