मल्टिफ्लेक्सचे नुतनीकरण मार्गी
प्रतिनिधी / पणजी
राज्य सरकारच्या पणजीत असलेल्या मल्टिफ्लेक्स आयनॉक्स कंपनीला पुढील 15 वर्षे लीजवर देण्यात आलेले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील या प्रकल्पाचा दर्जा राखण्यासाठी सध्या आयनॉक्स कंपनीने युद्धपातळीवर दुरुस्ती हाती घेतली आहे. या मल्टिफ्लेक्स प्रकल्पातून राज्यसरकारला येत्या नोव्हेंबरपासून 54 लाख महसूल मिळणार आहे.
गोवा मनोरंजन संस्थेचे चेअरमन सुभाष फळदेसाई यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले की, चित्रपट महोत्सव संचालनालयातर्फे आंचिमचे एक शिष्टमंडळ गोव्यात आले होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकरीता अत्युच्च व आंतरराष्ट्रीय सुविधा त्यात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गोवा मनोरंजन संस्थेने त्वरीत निविदा जारी केल्या असता पीव्हीगार व आयनॉक्स या दोन कंपन्यांनी अर्ज सादर केले, मात्र सर्वाधिक मासिक 54 लाख रुपये देण्याचे आयनॉक्सने नमूद केल्यानंतर गोवा सरकारने त्यांना हा मल्टिफ्लेक्स चालवायला दिला. त्यानंतर आयनॉक्स कंपनीने कोटय़वधी रुपये खर्चून यंत्रणा बदलण्याचे काम हाती घेतले आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जा राखण्यासाठी सध्या असंख्य माणसे नवीन यंत्रणा बसवित आहेत. साधारणतः 8 ते 10 कोटी पेक्षाही जास्त खर्च करीत असावी, परंतु आक्टोबर अखेरीस हे काम पूर्ण झाले पाहिजे. नोव्हेंबरच्या 1 तारीखपासून मल्टिफ्लेक्स सुरू झाले पाहिजे. त्या दिवसापासून गोवा सरकारला मासिक 54 लाख रुपये देणे बंधनकारक आहे. याशिवाय दरवर्षी त्यात 5 टक्केनी वाढ सूचविली आहे. सध्या प्रचंड प्रमाणात दुरूस्ती चालू आहे. अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी या प्रकल्पात जाऊन पाहणी केली. आयनॉक्स कंपनी या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा वापर करण्यासाठी सुविधा तसेच कचरा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्प शिवाय सौरउर्जा प्रकल्पाचा त्यात सामावेश आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देशातील अवघे काही मल्टिफ्लेक्स जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत त्यात गोवा सरकारच्या या प्रकल्पाचा सामावेश आहे. 15 वर्षानंतर हा प्रकल्प सदर कंपनी गोवा सरकारकडे सुपूर्द करील.