प्रेक्षकाविना मैदानावर घुमणार शड्डू : लढतीचा थरार ऑनलाईन अनुभविण्याची कुस्तीरसिकांना संधी
संजीव खाडे / कोल्हापूर
कोरोनाच्या काळातील लॉकडाऊन आणि नंतरच्या अनलॉकमध्येही सर्व खेळांच्या स्पर्धांना बंदी आहे. मात्र शारजाह, दुबईत प्रेक्षकाविना सुरू असणाऱया आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमी क्रिकेटचा लाईव्ह आनंद लुटत आहेत. हीच संकल्पना घेऊन महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाने लाईव्ह कुस्ती दंगल रविवार 18 ऑक्टोबरला आयोजित केली आहे. या मैदानावर मल्ल असणार आहेत, मात्र पेक्षक असणार नाहीत. पण या चटकदार लढती कुस्तीरसिकांना यूटूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहण्यास मिळणार आहेत.
देशातील पहिली ऑनलाईन कुस्ती दंगल
ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. वर्क फ्रॉम होम सुरू आहे. तर कुस्ती का ऑनलाईन नको ? आम्ही ती करू असा विचार करत महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाने कोरोनाचे सर्व नियम, अटींचे पालन करत कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. रविवारी 18 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता सुरू होणाऱया या मैदानात मल्ल असणार आहेत. पण पेक्षक असणार नाहीत. मात्र प्रेक्षकांना अर्थात कुस्तीशौकिनांना ऑनलाईन यूटूबवर या मैदानातील लढतील लाईव्ह पाहता येणार आहेत. देशात प्रथमच अशा प्रकाराची पहिली ऑनलाईन लाईव्ह कुस्ती दंगल आयोजित केल्याचा दावा संयोजकांनी केला आहे.
चार लढती आणि आठ मल्लांचा सहभाग
या मैदानात संतोष दोरवड विरूद्ध विष्णूपंत खोसे, विक्रम वडतीले विरूद्ध रवींद्र शेंडगे, आशिष वावरे विरूद्ध शशिकांत बोंगारडे, अनिकेत गावडे विरूद्ध अक्षय जाधव यांच्यात लढती होणार आहे.
हलगीचा कडकडाटत अन् समालोचन
हालगीवादक मारूती मोरे-गारगोटीकर यांची हालगी या कुस्ती मैदानात मल्लांना प्रोत्साहन आणि लढतीत रंग भरण्यासाठी कडाडणार आहे. ज्येष्ठ कुस्ती निवेदक पैलवान जोतिराम वाजे-सांगलीकर आपल्या दमदार शैलीत समालोचन करणार आहेत.
कोरोनाच्या नियमांचे काटेकारपणे पालन
मैदानात सहभागी आठही मल्लांची संपूर्ण आरोग्य तपासणी आणि कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. त्यांना आयसोलेटेडही करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सूचना, अटींचे पालन करण्यात आले आहे.
खुराकासाठी आकर्षक मोबदला
कोरोनामुळे गेले सहा महिने मैदाने झाली नसल्याने मल्लांना लढतींना आणि मानधनाला मुकावे लागले आहे. या मैदानातील आठही मल्लांना खुराकासाठी आकर्षक मोबदला देण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
मोबाईल किंवा संगणक हेच मैदानाचे ठिकाण
कुस्तीशौकिनांनी गर्दी करून नये यासाठी संयोजकांनी या कुस्ती मैदानाचे ठिकाण जाहीर केलेले नाही. गोपनिय ठेवले आहे. मात्र कुस्तीशौकिनांसाठी मोबाईल किंवा संगणक हेच कुस्ती मैदानाचे ठिकाण असणार आहे. कुस्ती मल्लविद्या युटूब चॅनेलवर पुढील लिंकव्दारे कुस्ती मैदानाचा आनंद लुटता येणार आहे. ती लिंक अशी :
https://youtu.be/AGGHdsxEc2I