दोन वेळा जेतेपद मिळवणाऱया संघाला खुणावतेय पुन्हा यशाचे शिखर
कोलकाता / वृत्तसंस्था
दोन वेळा आयपीएल जेतेपदावर शिक्कामोर्तब करणाऱया कोलकाता नाईट रायडर्सची अलीकडील काही वर्षात मात्र जेतेपदाची पाटी कोरीच राहिली आहे. साहजिकच, आता गतवैभव खेचून आणण्यावर या संघाचा पूर्ण फोकस असणार आहे. गौतम गंभीर बाहेर झाल्यानंतर या संघाला सातत्याने झगडावे लागले असल्याचे प्रातिनिधिक चित्र आहे. या संघाने 2012 व 2014 मध्ये गंभीरच्या नेतृत्वाखाली दोन जेतेपदे संपादन केली आहेत.
अगदी सलामी जोडी निवडणे असेल, मध्यफळीत फलंदाजी लाईनअप उभारणे असेल किंवा उत्तम फिनिशर निवडणे असेल, या प्रत्येक निकषावर केकेआरला मागील आवृत्तीत झगडावे लागले आहे. शिवाय, नेतृत्वाच्या निकषावर देखील त्यांची निराशाच झाली आहे. 50 टक्के तंदुरुस्त असलेल्या आंद्रे रसेल व सुनील नरेन यांच्यावर त्यांची बरीचशी भिस्त असेल. यापैकी सुनील नरेनच्या गोलंदाजी शैलीवर यापूर्वी आक्षेप घेतला गेला होता. त्यामुळे, त्याची उपयुक्तता किती, हे प्रत्यक्ष स्पर्धेतच स्पष्ट होऊ शकेल. यंदा केकेआरच्या आयपीएल मोहिमेचा श्रीगणेशा 11 एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीने होईल.
मॉर्गन कर्णधार ही जमेची बाजू
इयॉन मॉर्गन हा यंदा कोलकाता नाईट रायडर्सचे प्रथमच पूर्ण वेळ नेतृत्व भूषवणार आहे. मागील हंगामात 7 सामन्यानंतर नेतृत्वात फेरबदल झाल्यानंतर त्याच्याकडे ही धुरा सोपवली गेली होती. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील लढवय्या कर्णधार म्हणून मॉर्गनने स्वतंत्र ओळख प्राप्त केलेली आहे. इंग्लंडला वनडे विश्वचषक जिंकून देणाऱया मॉर्गनचा अनुभव ही यंदा केकेआरची जमेची बाजू असेल.
मागील हंगामात मॉर्गनने 14 डावात 41.80 च्या सरासरीने 418 धावांची आतषबाजी केली आणि यात 24 उत्तुंग षटकारांचा प्राधान्याने समावेश राहिला होता. विशेषतः हाणामारीच्या षटकात त्याची फटकेबाजी बहरते, त्यामुळे देखील केकेआरचा संघ येथे महत्त्वाकांक्षी असल्यास त्यात आश्चर्याचे कारण नाही. केकेआरने मिनी लिलावात उत्तम बदल केले असून ही बाब त्यांच्या पथ्यावर पडू शकते.
शकीब हसनशी करार
या संघाने बांगलादेशचा स्टार अष्टपैलू शकीब-अल-हसनला संघात परत पाचारण करत उत्तम रणनीतीची चुणूक दाखवून दिली आहे. शिवाय, 2016 आयपीएल फायनलमधील सामनावीर बेन कटिंगला करारबद्ध करत त्यांनी आणखी एक पर्याय उपलब्ध असेल, याची खातरजमा करवून घेतली आहे. मागील हंगामात नरेन व आंद्रे रसेल हे दोन्ही खेळाडू सपशेल अपयशी ठरले होते. त्या पार्श्वभूमीवर, त्यांनी केलेला हा फेरबदल लक्षवेधी ठरु शकतो.
फिरकीच्या आघाडीवर चिंतेची छटा
कोलकाता नाईट रायडर्सला विशेषतः फिरकी गोलंदाजीच्या आघाडीवर बरेच झगडावे लागले असून हीच त्यांची या हंगामातील मुख्य चिंता असणार आहे. कुलदीप यादवची जादू आता पूर्ण ओसरली आहे. तसेच नरेनच्या गोलंदाजीवर मागील हंगामातच आक्षेप घेतले गेले होते. याच कारणामुळे त्याला 4 सामन्यात खेळताही आले नव्हते. नरेनच्या गैरहजेरीत त्यावेळी तामिळनाडूच्या वरुण चक्रवर्तीने 17 बळी घेत संधीचा उत्तम लाभ घेतला. मात्र, सध्याच्या घडीला तो पूर्ण तंदुरुस्त नाही आणि त्यामुळे, केकेआरसमोरील प्रश्नचिन्ह कायम आहे.
कोलकाता नाईट रायडर्स ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नितीश राणा, टीम सेफर्ट, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वॉरियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शकीब अल हसन, शेल्डॉन जॅक्सन, वैभव अरोरा, हरभजन सिंग, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर, पवन नेगी.
मॉर्गनच्या साथीला दिनेश कार्तिक, हे केकेआरचे बलस्थान
आयपीएल स्पर्धेत यापूर्वी केकेआर संघाचे नेतृत्व दिनेश कार्तिककडे होते. मात्र, त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय कळवला. त्यानंतर इंग्लंडचा दिग्गज कर्णधार, अनुभवी फलंदाज इयॉन मॉर्गनकडे या संघाच्या नेतृत्वाची कवचकुंडले सोपवली गेली आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कुशल कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱया मॉर्गनच्या साथीला लढवय्या दिनेश कार्तिकही असल्याने हे केकेआर संघाचे बलस्थान असणार आहे.
युवा सनसनाटी गोलंदाज एम. प्रसिद्ध कृष्णाकडूनही भरीव अपेक्षा
कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या मोसमासाठी स्टार सनसनाटी गोलंदाज एम. प्रसिद्ध कृष्णाला करारबद्ध केले असून त्यामुळे, नव्या चेंडूवर त्यांची गोलंदाजी लाईनअप भक्कम असणार आहे. प्रसिद्ध कृष्णाने अलीकडेच इंग्लंडविरुद्ध संपन्न झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या लढतीत 54 धावात 4 बळी घेत स्वप्नवत पदार्पण केले आहे. एम. प्रसिद्ध कृष्णासह पॅट कमिन्स व लॉकी फर्ग्युसन असा जलद गोलंदाजीचा ताफा त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहे.