ढाका / वृत्तसंस्था
आयपीएल या लोकप्रिय टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या टीव्ही आणि डिजिटल प्रसारणाच्या अधिकारांची पुढील पाच वर्षांसाठीची विक्री 44,075 कोटी रुपयांना करण्यात आली आहे. या संबंधीचा लिलाव सोमवारी करण्यात आला. टीव्ही प्रसारणाचे अधिकार एका कंपनीने, तर डिजिटल प्रसारणाचे अधिकार अन्य कंपनीने पटकाविले आहेत. विजेत्या कंपन्यांची नावे अद्याप घोषित झालेली नाहीत.
2023 ते 2027 कालखंडातील पाच आयपीएल स्पर्धांसाठीचा हा लिलाव होता. या पाच स्पर्धांमध्ये एकंदर 410 सामने होणार आहेत. प्रत्येक सामन्याच्या प्रसारणासाठी 107.5 कोटी रुपयांची बोली लागली होती. हा लिलाव टीव्ही प्रसारण आणि डिजिटल प्रसारण यांच्यासाठी स्वतंत्ररित्या करण्यात आला. पॅकेज अ हे टीव्ही प्रसारणासाठी होते. त्याला 23,575 कोटी रुपयांची बोली मिळाली. तर डिजिटल प्रसारणाच्या पॅकेज ब करीता 20,500 कोटी रुपयांची बोली मिळाली.
पाच वर्षांमध्ये अडीच पट वाढ
2017 मध्ये जो लिलाव करण्यात आला होता, त्यापेक्षा 2022 मध्ये केलेल्या या लिलावातून अडीच पट जास्त रक्कम आयपीएल व्यवस्थापनाच्या हाती लागली असल्याचे दिसून येत आहे. यावरुन या स्पर्धेची लोकप्रियता वाढत असल्याचे मत व्यक्त होत असून यावर संबंधितांनी समाधान व्यक्त केले आहे.
चार पॅकेजिसमध्ये विभागणी
या एकंदर लिलाव प्रक्रियेची विभागणी चार (ए, बी, सी, डी) पॅकेजिसमध्ये करण्यात आली होती. पॅकेज अ किंवा ए हे विशेषत्वाने भारतीय उपखंडातील टीव्ही प्रसारणासाठी होते. पॅकेज ब किंवा बी हे विशेषत्वाने डिजिटल प्रसारणासाठी होते. पॅकेज क किंवा सी हे प्रत्येक स्पर्धेतील निवडक 18 सामन्यांच्या भारतीय उपखंडातील डिजिटल प्रसारणासाठी होते. तर हे सर्व सामन्यांच्या विदेशांतील सामायिक टीव्ही आणि डिजिटल प्रसारणासाठी होते. प्रत्येक बोलीदाराने या चारही पॅकेजिससाठी स्वतंत्र बोली लावली होती, अशी माहिती देण्यात आली.