आगामी आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दि. 12 व दि. 13 फेब्रुवारी रोजी रंगणाऱया मेगा ऑक्शनमध्ये आपली रणनीती काय असेल, हे जवळपास सर्व प्रँचायझींनी निश्चित केले आहे. बेंगळूरमध्ये आयोजित या लिलावाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर अनिश्चिततेचा आणखी प्रत्यय येऊ शकतो. मात्र, तिन्ही आघाडय़ांवर योग्य समतोल साधण्यासाठी, संघाची उत्तम जडणघडण करण्यासाठी काही प्रँचायझींची ठरावीक खेळाडूंना करारबद्ध करण्यावर भर असेल. त्यातील आणखी काही खेळाडूंवर हा प्रकाशझोत…
दिल्लीने रिटेन न केलेला कॅगिसो रबाडा
दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा हा जागतिक स्तरावरील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक. त्याला सामोरे जाणे अगदी दिग्गज फलंदाजांसाठी देखील आव्हानात्मक असते. पण, दिल्ली कॅपिटल्स संघाने या स्पीडस्टारला रिलीज करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दिल्लीने त्यावेळी रबाडाऐवजी त्याचाच राष्ट्रीय सहकारी ऍनरिच नोर्त्झेला रिटेन करण्याचा निर्णय घेतला.
26 वर्षीय रबाडा 2020 च्या आयपीएल हंगामात सर्वाधिक बळी घेण्यात यशस्वी ठरला. त्याने त्यावेळी 17 सामन्यात 30 बळी घेतले. शिवाय, दिल्ली कॅपिटल्सला फायनलपर्यंत धडक मारुन देण्यात सिंहाचा वाटा उचलला. या स्पीडस्टारने दक्षिण आफ्रिकेच्या भारताविरुद्ध कसोटी विजयात देखील लाख मोलाचे योगदान दिले. त्याने तेथेही 3 सामन्यात 20 गडी बाद केले.
या दिग्गज गोलंदाजाने आतापर्यंत 50 आयपीएल सामन्यात 76 बळी घेतले. शिवाय, दडपणाखाली त्याची गोलंदाजी अधिक बहरते, असे अनेकदा दिसून आले आहे. साहजिकच, दिल्लीने रिलीज केले असल्याने या लिलावात रबाडाला करारबद्ध करण्यासाठी चुरस रंगली तर ते साहजिक असेल.
ट्रेंट बोल्टचा अनुभव महत्त्वाचा ठरणार का?
2020 मधील आयपीएल जेतेपद मिळवून देण्यात बोल्टने 25 बळींसह सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र, मागील महिन्यात त्याला केवळ 13 बळींवर समाधान मानावे लागले आणि त्याची जादू ओसरली का, अशी चर्चा सुरु झाली. मुंबई इंडियन्सतर्फे नव्या चेंडूवर जसप्रित बुमराह व बोल्ट ही जोडगोळी प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक मानली गेली. पण, मुंबई इंडियन्सने बोल्टऐवजी अन्य खेळाडूंना प्रथम पसंती दिली.
बोल्टला भारतीय खेळपट्टय़ांवर खेळण्याचा गाढा अनुभव आहे आणि हीच त्याची जमेची बाजू आहे. याशिवाय, न्यूझीलंडतर्फे विविध क्रिकेट प्रकारात त्याने लक्षवेधी योगदान दिले आहे. वाढते वय, ही मुख्य चिंता असली तरी त्याचा अनुभव पाहता प्रँचायझी त्याला करारबद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असू शकतात.
नव्याने तंदुरुस्त झालेला वॉशिंग्टन सुंदर
वॉशिंग्टन सुंदरला मागील मार्च महिन्यापासून फारसे खेळता आलेले नाही. विविध दुखापतींनी सातत्याने त्याचा पिच्छा पुरवला आहे. पण, त्याने विजय हजारे चषक वनडे स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम पुनरागमन नोंदवले आणि तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. त्याने हजारे चषक स्पर्धेत 8 सामन्यात 16 बळी घेतले. शिवाय, 148 धावांचे योगदानही दिले.
वॉशिंग्टन सुंदरला मागील महिन्यात कोरोनाची बाधा झाल्याने तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत खेळू शकला नाही. मागील चार हंगामात आरसीबीचे प्रतिनिधीत्व करत आलेल्या या दिग्गज खेळाडूने 42 सामन्यात 6.93 अशी प्रभावी इकॉनॉमी नोंदवली असून पॉवर प्लेमधील त्याची काटेकोर गोलंदाजी लक्षवेधी ठरत आली आहे. भारताचा सर्वोत्तम युवा टी-20 क्रिकेटपटू म्हणून नावारुपास आलेल्या या खेळाडूला करारबद्ध करण्यासाठी चुरस रंगण्याची चिन्हे आहेत.
शार्दुल ठाकुरचे अष्टपैलूत्व महत्त्वाचे ठरणार का?
मागील काही वर्षात शार्दुल ठाकुरने विविध स्तरावर अगदी देदीप्यमान यश संपादन केले आहे. तो भारतीय संघातर्फे तसेच आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सतर्फे सुपरहिट कामगिरी करण्यात यशस्वी ठरला आहे. मागील हंगामात त्याने चेन्नईला विजय संपादन करुन देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याने चेन्नईतर्फे सर्वाधिक बळीही (16 सामन्यात 21) नोंदवले.
फलंदाजीतील त्याची बेधडक वृत्ती अनेकदा लक्षवेधी यश मिळवून देऊन गेली आहे. अगदी इंग्लंड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे कसोटीतील काही डाव महत्त्वाचे ठरले होते. भारतात अष्टपैलू खेळाडू फारसे उपलब्ध होत नाहीत, हा पूर्वानुभव पाहता शार्दुलला करारबद्ध करणे हा 10 प्रँचायझींसाठी प्राधान्यक्रम असू शकतो.
क्विन्टॉन डी कॉकचा अनुभवही उपयुक्त ठरणार
मागील काही हंगामात क्विन्टॉन डी कॉकने रोहित शर्मासमवेत काही धुवांधार डाव साकारले आहेत. त्याने 2020 च्या स्वप्नवत हंगामात 16 सामन्यात 140 च्या सरासरीने 503 धावांची आतषबाजी केली. त्यापूर्वी एका हंगामात त्याने 529 धावांची लयलूट केली होती. डी कॉक विश्वासार्ह यष्टीरक्षक-फलंदाज असून अगदी अलीकडे भारताविरुद्ध त्याने अनुक्रमे 27, 78 व 124 धावांचे उत्तम डाव साकारले होते. या लिलावात त्याला करारबद्ध करण्यासाठी प्रत्येक प्रँचायझी पुढे सरसावत असेल तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल.