वृत्तसंस्था/ किंग्जस्टन
अँडी मॅकब्राईन आणि हॅरी टेक्टर यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर आयर्लंडने रविवारी येथे झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या वनडे सामन्यात विंडीजचा 2 गडय़ांनी पराभव करत तीन सामन्यांची ही मालिका 2-1 अशी जिंकली. आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व मिळाल्यानंतर आयर्लंड संघाचा विदेशातील हा पहिला ऐतिहासिक मालिका विजय आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीजचा डाव 44.4 षटकात 212 धावांत आटोपला. शाय होपने 53 तर जेसन होल्डरने 44 धावांचे योगदान दिले. या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजच्या यंगने शाय होप आणि ग्रिव्हेस यांना पाठोपाठच्या षटकात बाद केल्यानंतर विंडीजची मधली फळी कोसळली आणि 17 षटकात विंडीजने 57 धावांत 7 गडी गमवले. आयर्लंडतर्फे मॅकब्राईनने 28 धावांत 4 तर यंगने 43 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडने 44.5 षटकात 8 बाद 214 धावा जमवित सामना आणि मालिका जिंकली. आयर्लंडतर्फे मॅकब्राईनने 59 तर टेक्टरने 52 आणि पॉल स्टर्लिंगने 44 धावांचे योगदान दिले. विंडीजतर्फे अकिल हुसेनने 59 धावांत 3 गडी बाद केले. या मालिकेत विंडीजने पहिला सामना जिंकून आयर्लंडवर आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर आयर्लंडने पुढील सलग दोन सामने जिंकून विंडीजचे या मालिकेतील आव्हान संपुष्टात आणले.
संक्षिप्त धावफलक
विंडीज- 44.4 षटकात सर्व बाद 212. (शाय होप 53, होल्डर 44, अकिल हुसेन 23, ओडेन स्मिथ 20, चेस 19, पेग यंग 3-43, मॅकब्राईन 4-28), आयर्लंड- 44.5 षटकात 8 बाद 214. (मॅकब्राईन 59, टेक्टर 52, स्टर्लिंग 44, कॅम्फर 11, अकिल हुसेन 3-59, चेस 3-44).