वृत्तसंस्था / लंडन
आयर्लंड आणि झिंबाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेतील बेलफास्ट येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात आयर्लंडने झिंबाब्वेचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे 7 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात पावसाचा अडथळा आला होता.
प्रथम फलंदाजी करताना झिंबाब्वेचा डाव 34 षटकांत 131 धावांत आटोपला. त्यानंतर पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी आयर्लंडला विजयासाठी 32 षटकांत 118 धावांचे नवे उद्दीष्ट दिले. आयर्लंडने 22.2 षटकांत 3 बाद 118 धावा जमवित हा सामना 7 गडय़ांनी जिंकत मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली. या मालिकेतील पहिला सामना झिंबाब्वेने जिंकला होता. आयर्लंडच्या अँडी मॅकब्राईनला ‘सामनावीर’ तर विल्यम पोर्टरफिल्डला ‘मालिकावीर’ म्हणून जाहीर करण्यात आले.
झिंबाब्वेच्या डावात कर्णधार एर्वीनने 65 चेंडूत 57, मधेवेरेने 16, जाँग्वेने 10 धावा जमविल्या. झिंबाब्वेच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. आयर्लंडतर्फे लिटल आणि मॅकब्राईनने प्रत्येकी तीन तर सिमीसिंगने 2 आणि गेटकेटने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडच्या डावात सलामीच्या पोर्टरफिल्डने 33 चेंडूत 16, स्टर्लिंगने 40 चेंडूत 43, कर्णधार बलबिर्नीने 43 चेंडूत 34 आणि टेक्टरने नाबाद 13 धावा जमविल्या. झिंबाब्वेतर्फे मुझारबनी, निगरेव्ह आणि मासाकेझा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. झिंबाब्वेच्या टेलरचा हा शेवटचा म्हणजे 284 वा आंतरराष्ट्रीय सामना होत. तो या सामन्यात केवळ सात धावांवर बाद झाला.
संक्षिप्त धावफलक ः झिंबाब्वे 34 षटकांत सर्वबाद 131 (एर्वीन 57, मधेवेरे 16, जाँग्वे 10, लिटल 3-33, मॅकब्राईन 3-26, सिमी सिंग 2-35, गेटकेट 1-25), आयर्लंड 22.2 षटकांत 3 बाद 118 (पोर्टरफिल्ड 16, स्टर्लिंग 43, बलबिर्नी 34, टेक्टर नाबाद 13).