वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
येत्या जुलै महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा क्रेकेट संघ आयर्लंडच्या दौऱयावर जाणार आहे. आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिका आयर्लंडमध्ये खेळविल्या जाणार आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची दक्षिण आफ्रिकेत होणारी कसोटी मालिका लांबणीवर टाकण्यात आल्याने या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ आयर्लंडच्या दौऱयावर जाणार आहे. 2018 ते 2023 या कालावधीतील एफटीपीच्या टूर कार्यक्रमानुसार उभय संघातील होणारे वनडे सामने हे विश्वचषक सुपर लीग स्पर्धेचा एक भाग आहे. सदर वनडे आणि टी-20 सामने 11 ते 25 जुलै दरम्यान आयर्लंडमधील मॅलेहिदे आणि स्टोअरमाँट येथे खेळविण्यात येतील. 2007 नंतर दक्षिण आफ्रिका संघाचा आयर्लंडचा हा पहिला दौरा आहे.
आयर्लंड क्रिकेट मंडळाने झिंबाब्वेविरूद्धच्या आगामी मालिकेची घोषणा केली आहे. उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. विश्वचषक सुपर लीग स्पर्धेचा हा एक भाग आहे. हे सामने स्टोअरमाँट आणि ब्रॅडी येथे खेळविले जातील.
आयर्लंड क्रिकेट मंडळाने 2021 च्या उन्हाळी मोसमातील स्पर्धा कार्यक्रम जाहीर केला आहे. आयर्लंडचा संघ जून माहिन्यात हॉलंडचा दौरा करणार असून या दौऱयात तीन वनडे सामने निश्चित केले आहेत. हे सामने 2, 4, 7, जूनला खेळविले जातील. दक्षिण आफ्रिकेचा संघ आयर्लंडच्या दौऱयावर जुलै महिन्यात येणार आहे. उभय संघातील वनडे सामने 11, 13, 16 जुलै रोजी तसेच 20, 22, 25 जुलै रोजी उभय संघात तीन टी-20 सामने होणार आहेत. झिंबाब्वेचा संघ ऑगस्ट महिन्यात आयर्लंडच्या दौऱयावर येणार आहे. उभय संघामध्ये तीन वनडे सामने 6, 8, 11 ऑगस्ट रोजी खेळविले जातील. त्यानंतर 15, 17, 20 ऑगस्ट रोजी उभय संघातील तीन टी-20 सामने होणार आहेत. आयर्लंडमध्ये कोरोना संदर्भातील नियम काटेकोरपणे अंमलात आणले जात असून दक्षिण आफ्रिका संघाला आयर्लंडमध्ये 14 दिवसांच्या कालावधीसाठी सक्तीचे क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.