पात्रता अ स्पर्धेत दोन्ही संघ अंतिम फेरीत दाखल, ओमान,नेपाळचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ मस्कत
यावर्षी होणाऱया पुरुषांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आयर्लंड व संयुक्त अरब अमिरात यांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. येथे सुरू असलेल्या पात्रता अ स्पर्धेतील उपांत्य सामन्यात आयर्लंडने यजमान ओमानचा 56 धावांनी पराभव करून विश्वचषकातील स्थान निश्चित केले. दुसऱया उपांत्य सामन्यात यूएईने पात्रता स्पर्धेत अपराजित राहिलेल्या नेपाळचा 68 धावांनी पराभव करीत ऑस्ट्रेलियातील स्पर्धेचे तिकीट निश्चित केले.
टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची आयर्लंडची ही सलग सातवी वेळ असेल तर यूएई दुसऱयांदा या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. आयर्लंडला 2007 मधील पहिली स्पर्धा हुकली होती. अँडी बलबिर्नीच्या आयरिश संघाने स्पर्धेची डळमळीत सुरुवात करताना पहिला सामना गमविला होता. पण नंतर मुसंडी मारत सलग विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यात ओमानने फलंदाजी दिल्यावर आयर्लंडने 20 षटकांत 7 बाद 167 धावा जमविल्या. 2 बाद 19 अशा स्थितीनंतर गॅरेथ डेलानीने 32 चेंडूत 47 धावा फटकावत संघाला सुस्थितीत आणले. अखेरच्या टप्प्यात अँडी मॅकब्राईनने 21 चेंडूत 36 तडकावत संघाला दीडशतकी मजल मारून दिली होती. मागील दोन वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेल्या ओमानला सुरुवातीपासूनच गळती लागली आणि 109 धावांत त्यांचा डाव आटोपला. आयरिश स्पिनर्स सिमी सिंगने 20 धावांत 3 तर मॅकब्राईनने 24 धावांत 2 बळी टिपले.
यूएईची नेपाळवर मात
दुसरा उपांत्य सामनाही एकतर्फीच झाला. नेपाळविरुद्धच्या या लढतीत यूएईने 7 बाद 175 धावा फटकावल्या. यष्टिरक्षक व्ही. अरविंदने जलद 46 व मोहम्मद वसीमने 70 धावा फटकावल्या. नेपाळला हे आव्हान पेलवले नाही. 3 बाद 14 अशा स्थितीनंतर त्यांचा संघ सावरू शकला नाही आणि 18.4 षटकांत त्यांचा डाव 107 धावांत आटोपला. नेपाळच्या दिपेंद्रने 38 धावा जमविल्या तर यूएईच्या अहमद रझाने 19 धावांत 5 बळी टिपले.
आणखी दोन संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार असून ही पात्रता ब स्पर्धा जुलैमध्ये झिम्बाब्वेत होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः आयर्लंड 20 षटकांत 7 बाद 165 (डेलानी 47, मॅकब्राईन 36, बिलाल 3-23, कलीमुल्लाह 2-40), ओमान सर्व बाद 109 (शोएब 30, सिमी सिंग 3-20, लिटल 2-14).
संयुक्त अरब अमिरात 20 षटकांत 7 बाद 175 (वसीम 70, अरविंद 46, मुखिया 35), नेपाळ सर्व बाद 107 (दिपेंद्र 38, अहमद रझा 5-19).