वृत्तसंस्था/ साऊदम्पटन
इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात होणाऱया आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आयर्लंडचा 14 जणांचा संघ जाहीर करण्यात आला. या मालिकेसाठी आयर्लंड संघाचे नेतृत्त्व अँड्रय़ू बलबिर्नीकडे सोपविण्यात आले आहे.
या मालिकेसाठी आयर्लंडने 22 क्रिकेटपटूंना निवडले आहे. यापैकी 8 क्रिकेटपटू राखीव म्हणून राहतील. या मालिकेतील पहिला सामना येत्या गुरुवारी 30 जुलै रोजी साऊदम्पटन येथे खेळविला जाईल.
आयर्लंड संघ- अँड्रय़ू बलबिर्नी (कर्णधार), पॉल स्टर्लिंग, पोर्टरफिल्ड, कॅम्फर, लिटल, डेलनी, मॅकब्राईन, मॅकार्थी, केविन ओब्रायन, रॅनकिन, सिमि सिंग, हॅरी टेक्टर, टकर आणि क्रेग यंग.
या वनडे मालिकेमुळे आयर्लंड संघाला बलाढय़ आणि विश्वविजेत्या इंग्लंड संघाविरुद्ध दर्जेदार कामगिरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचप्रमाणे 2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पात्रतेसाठी आयर्लंड संघाला आपल्या कामगिरीत सुधारणा करता येईल. कोरोना महामारीमुळे आयर्लंडच्या क्रिकेटपटूंना जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीत क्रिकेटचा सराव करता आला नव्हता. पण अलीकडेच त्यांनी दोन सराव सामने खेळले होते. यजमान इंग्लंडचा संघ सध्या विंडिजविरुद्धची कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंडने या मालिकेत विंडीजचा पराभव केला आहे. इंग्लंडचा संघ आपली विजयी घोडदौड या आगामी वनडे मालिकेत राखण्याचा प्रयत्न करेल.