शहर वार्ताहर / राजापूर
शहरानजीकच्या उन्हाळे कुंभारवाडी येथे मुंबई गोवा महामार्गावर केबलने भरलेला आयशर टेम्पो मातीच्या भरावावर चढून पलटी झाल्याची घटना घडली असून यामध्ये टेम्पो चालक दिलीपकुमार नरेश सिंह (23) रा. शेहुचंदपूर, बेगनी, उत्तर प्रदेश हा जागीच ठार झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी 6.30 वा. दरम्यान घडली.
गोवा वेरणे येथून चालक दिलीपकुमार सिंह केबलने भरलेला आयरश टेम्पो उत्तरप्रदेशकडे घेऊन चालला होता. उन्हाळे कुंभारवाडी येथे येताच समोरून येणाऱया वाहनाला बाजू देत असताना सिंह यांचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या भरावावर चढल्याने पलटी होऊन अपघात झाला. यावेळी सिंह यांनी अपघातातून वाचण्यासाठी बाहेर उडी मारली मात्र भरावावर चढलेला टेम्पो त्याच गतीने मागे येत सिंह यांच्या अंगावर चढला असल्याने यामध्ये सिंह यांचा चिरडून मृत्यू झाला आहे. वाहनामध्ये चालक दिलीपकुमार सिंह व क्लिनर अनुज सिंह हे दोघे होते. अपघाताचे वृत्त कळताच येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत क्लिनर अनुज सिंह याला वाचविले.
अपघाताचे वृत्त कळताच सहायक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल कमलाकर तळेकर, श्री.गोळीलवार, सचिन बळीप, चालक श्री.घोगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत चालकाचा मृतदेह तात्काळ राजापूर ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आला. या अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कमलाकर तळेकर हे करीत आहेत.
…