@ वृत्तसंस्था / अहमदाबाद
अहमदाबाद येथे साबरमती नदीत 3 दिवसांपूर्वी उडी घेत आत्महत्या करणाऱया 23 वर्षीय आयशाच्या पतीला राजस्थानच्या पाली येथून सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. आयशाने आत्महत्येपूर्वी एक चित्रफितरुपी संदेश पाठविला होता. तसेच आईवडिलांसोबत तिच्या अखेरच्या संभाषणाची ध्वनिफितही समोर आली होती. यात आयशाने पतीवर शोषणाचा आरोप केला होता.
आयशाचा पती आरिफ राजस्थानच्या जालौरचा रहिवासी आहे. आयशाचा व्हिडीओ मेसेज शनिवारी मोठय़ा प्रमाणावर प्रसारित झाला होता. त्यानंतर गुजरात पोलीस जालौरमध्ये आरिफच्या घरी पोहोचले असता तो फरार झाल्याचे आढळून आले होते. मोबाईल लोकेशनच्या आधारावर आरोपीला सोमवारी रात्री पाली येथून जेरबंद करण्यात आले आहे.
आयशा अर्थशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासह एका खासगी कंपनीत काम करत होती. 6 जुलै 2018 रोजी तिचा आरिफसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर हुंडय़ापोटी तिचा छळ केला जात होता. याची माहिती कळताच आयशाला तिच्या आईवडिलांनी माहेरी आणून पती आरिफ, सासरा-सासू तसेच नणंदेच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा नोंदविला होता.