बँक मॅनेजरसह शाखेतील अन्य कर्मचारी सामील असल्याचा आरोप : मडगाव पोलिसात तक्रार दाखल, चौकशी सुरु
प्रतिनिधी/ मडगाव
आयसीआयसीआय बँकेने एका ग्राहकाच्या खात्यात असलेल्या सुमारे 1.20 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचे प्रकरण उजेडात आले असून या प्रकरणात बँकेचा खुद्द शाखा व्यवस्थापक गुल्शन गुसाई व याच बँकेतील इतर बँक कर्मचारी गुंतलेले असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी लवकरच धरपकड सुरु होणार आहे.
आर्लेम शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक गुल्शन गुसाई, आर्लेम शाखेतील या बँकेचे सर्व कर्मचारी, बंगळूर येथील ए. एस. एन्टरप्रायझेसचे मालक तथा भागीदार तथा संचालक, बंगळूर येथील मेसर्स लोहरी कस्टम फर्निचर या आस्थापनाचे संचालक तसेच बाप्तीस्ता जोजेफ फर्नाडिस हे या प्रकरणातील संशयित आरोपी असल्याची नावे तक्रारदाराने तपास यंत्रणेला दिलेली आहेत.
मडगावातील एस. पै काणे हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. या प्रकरणातील बँक व्यवस्थापक गुल्शन गुसाई याने तक्रारदाराकडून कोऱया धनादेशावर सही घेतली. इतकेच नव्हे तर तक्रारदाराचे वडिल जे आखाती देशात असतात त्यांनाही तक्रारदाराच्या खात्याचा संयुक्त खातेदार बनवला. आयसीआयसीआय प्रुडन्शियल लाईफ इन्शुरन्स या विमा कंपनीच्या पॉलिसीचा हप्ता भरतो असे सांगून 1 कोटी 20 लाख 50 हजार रुपयांची अफरातफर केली. अर्थात ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली असे तक्रारदाराने पोलिसात केलेल्या तक्रारीत म्हटलेले आहे.
विमा पोलिसीत रक्कम भरतो असे सांगून आरोपीनी ही एकूण रक्कम वेळोवेळी बंगळूर येथील ए. एस. एन्टरप्रायझेस तसेच बंगळूर येथील मेसर्स लोहरी कस्टम फर्निचर या आस्थापनाकडे वळविली असे पोलीस तक्रारी म्हटलेले आहे.
विम्याचा हप्ता न भरताच रक्कम स्वतः वापरली
एक कोटी विमा कव्हरसाठी 10 लाख रुपयांचा हप्ता होता. 2,90,876 रुपयाच्या हप्त्याची आणखी एक पॉलिसी होती. मार्च 2018 ते मे 2020 दरम्यान देय असलेली विम्याची ही रक्कम न भरता स्वतःच्या फायरद्यासाठी तक्रारदाराच्या रकमेचा वापर केला अशी फिर्याद पोलिसात करण्यात आली आहे.
तक्रारदाराचे वडिल आखाती देशात असतात. आयसीआयसीआय बँकेच्या या व्यवस्थापकाने तक्रारदाराच्या कुटुंबाकडे जवळीक साधली आणि पायाने काही प्रमाणात जर्जर असलेल्या तक्रारदाराच्यावतीने आपण सर्व आर्थिक कारभार पाहतो असे आश्वासन दिले. बँक व्यवस्थापक संशयित आरोपी गुल्शन याच्यावर ठेवलेला विश्वास तक्रारदाराला महागात पडला. एकूण 1 कोटी 20 लाख 50 हजार रुपयांना या बँकेकडे संलग्न असलेल्या कर्मचाऱयांनी तक्रारदाराला गंडविले.
या प्रकरणी पोलिसांनी वरील संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 403, 406, 409, 418, 420, 468, 471 कलमाखाली गुन्हा नोंद केला असून पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आलेला असून कोटय़वधीची रक्क्म गुंतलेल्या या गुन्ह्य़ासंबंधी लवकरच धरपकड सुरु होणार असल्याचे समजते.