तिन्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांना विविध संशोधन प्रकल्प सादरीकरणामध्ये सहभागी होता येणार
प्रतिनिधी /बेळगाव
वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन, बदलते नवीन प्रवाह, नवीन चाचण्या यासंदर्भात वैद्यकीय संशोधन संस्थांनी एकत्र येऊन कार्य करावे, या हेतूने आयसीएमआर (एनटीएम) बेळगाव, बिम्स बेळगाव, किम्स हुबळी यांच्यामध्ये मंगळवारी बेळगाव येथे समन्वय करार करण्यात आला. बेळगावच्या आयसीएमआर येथे दुपारी 4 वाजता झालेल्या कार्यक्रमात हा करार झाला.
या करारानुसार तिन्ही संस्था शास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांच्या कौशल्य विकासासाठी एकत्रित काम करतील. ज्याचा जनतेला आरोग्याच्या दृष्टीने लाभ होईल. आयसीएमआरच्या संशोधकांना बिम्स बेळगाव आणि किम्स हुबळी येथे काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तिन्ही संस्थांच्या उद्दिष्टानुसार एकत्रितपणे संशोधन प्रक्रिया सुरू करता येईल. तिन्ही संस्थांना परस्परांच्या विद्यार्थ्यांना विविध संशोधन प्रकल्प सादरीकरणामध्ये सहभागी करून घेतले जाईल. तिन्ही संस्था एकत्रितपणे परिषदा, चर्चासत्रे आणि परिसंवादाचे आयोजन करतील. तिन्ही संस्था पेटंट्स आणि वैद्यकीय अहवाल प्रकाशन याबाबत एकत्रित काम करतील. आपला वैद्यकीय आणि वैज्ञानिक तपशील परस्परांना आदानप्रदान करतील, असे करारान्वये ठरले आहे.
आयसीएमआरने पारंपरिक वनस्पती औषधांचा उपयोग करून घेत राज्याच्या आरोग्य खात्याशी संलग्न कार्य सुरू केले आहे. कोविड काळात आयसीएमआरने 2 लाखाहून अधिक चाचण्या केल्या आहेत. याबद्दलचा अहवाल जागतिक स्तरावरील जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
बिम्स आयसीएमआरचे संचालक डॉ. देवप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात बेळगावचे प्रादेशिक आयुक्त व बिम्सचे प्रशासक अम्लान आदित्य बिस्वास, बिम्सचे प्रभारी संचालक डॉ. उमेश कुलकर्णी, किम्सचे संचालक डॉ. आर. सी. अंतराणी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. हर्षा हेगडे यांनी स्वागत केले. डॉ. अनुश्री दास यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. चेतन ए. सी. यांनी आभार मानले.