पाच जहाजांपैकी पहिले जहाज देशाच्या सेवेत दाखल
प्रतिनिधी / वास्को
गोवा शिपयार्डतर्फे भारतीय तटरक्षक दलासाठी बांधण्यात आलेले ‘आयसीजीएस सच्चेत’ हे अत्याधुनिक अपतटीय गस्ती जहाज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याहस्ते काल शुक्रवारी गोवा शिपयार्डमध्ये ई-कमिशनिंगद्वारे देशाला समर्पित करण्यात आले. गोवा शिपयार्डतर्फे तटरक्षक दलासाठी बांधण्यात येणाऱया पाच गस्ती जहाजांच्या मालिकेतील हे पहिले गस्ती जहाज आहे.
हे जहाज दि. 2 फेब्रुवारी 2020 रोजी तटरक्षक दलाकडे अधिकृतरित्या सुपूर्द करण्यात आले होते. शुक्रवारी या जहाजाच्या सेवेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
संरक्षण मंत्र्यांच्याहस्ते व्हिडिओ लिंकद्वारे शुभारंभ
नवी-दिल्ली येथून संरक्षण मंत्र्यांच्याहस्ते थेट व्हिडिओ लिंकद्वारे ‘आयसीजीएस सचेत’ अत्याधुनिक अपतटीय गस्ती जहाजाचे ई-कमिशनिंग करण्यात आले. सामाजिक अंतराचे पालन करीत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्ऱीपाद नाईक, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार (आयएएस), भारतीय तटरक्षक दलाचे महास्ंढचालक कृष्णस्वामी नटराजन, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालक कमांडर बी. बी. नागपाल व मोजकेच मान्यवर या कार्यक्रमासाठी गोवा शिपयार्डमध्ये उपस्थित होते. भारतीय तटरक्षक दलाच्या सी-450 व सी-451 या दोन इंटरसेप्टर जहाजांचेही ई-कमिशनिंग करण्यात आले.
संरक्षणमंत्र्यांकडून गोवा शिपयार्डचे कौतुक
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या जहाजांना भारतीय संरक्षण सेवेत समावून घेताना तटरक्षक दल व गोवा शिपयार्ड परिवारालाही शुभेच्छा संदेश दिला. लॉकडाऊनसारख्या कठीण परिस्थितीतही तटरक्षक दलाने या गस्ती जहाजाचे ई कमिशनिंगसारखा दुर्मिळ योग घडवून आणला. तसेच गोवा शिपयार्डनेही जहाज बांधणी व दुरूस्तीचे आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणे सुरू ठेवलेले आहे ही कौतुकास्पद बाब असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
जहाजावर अत्याधुनिक शस्त्रांसह संचार प्रणाली
आयसीजीएस ‘सच्चेत’ जहाज अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर व संचार प्रणालीने सुसज्ज आहे. गोवा हा अपतटीय गस्ती जहजासाठी असेल. घुसखोरी व समुद्र किनारपट्टीच्या मालमत्तेचा धोका रोखण्यासाठी आर्थिक क्षेत्रामध्ये समुद्रातील गस्त ठेवण्याची वाढती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची क्षमता वाढणार आहे.
तटरक्षक दलाचे महासंचालक नटराजन यांनी यावेळी बोलताना आयसीजीएस सच्चेत आणि दोन इंटरसेप्टर जहाजे दलाच्या ताफ्यात सामील झाल्यामुळे पश्चिम व पूर्वेकडील समुद्रात गस्त घालण्याच्या क्षमतेला अधिक बळ प्राप्त होणार असल्याचे सांगितले.
गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालक कमांडर बी. बी. नागपाल यांनी तटरक्षक दलाच्या अपतटीय गस्ती जहाजांच्या पाच जहाजांच्या मालिकेतील पहिल्या जहाजाचे संरक्षण मंत्रयांच्याहस्ते प्रवर्तीकरण होत आहे याबद्दल गोवा शिपयार्डला गर्व वाटत असल्याचे सांगितले. हे जहाज आता देशसेवेसाठी उपलब्ध झाले आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गोवा शिपयार्डमध्ये दीर्घकाळापासून चांगले संबंध आणि सहकार्य असून गोवा शिपयार्डला या सहयोगाचाही अभिमान असल्याचे कमांडर बी.बी.नागपाल म्हणाले. जहाजाच्या मालिकेतील उर्वरीत चार अपतटीय गस्ती जहाजांचे काम प्रगती पथावर असून ही जहाजे नियोजित वेळेत तटरक्षक दलाकडे सुपूर्द करण्याचे प्रयत्न जारी असल्याचे ते म्हणाले.