दुबई
सिडनी कसोटीत रविवारी भारतीय खेळाडूंवर वर्णभेदी टिपणी केल्याच्या घटनेचा आयसीसीनेही तीव्र निषेध केला असून संबंधित गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईचा अहवाल देण्याची मागणी त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे केली आहे. काही प्रेक्षकांनी असभ्य टिपणी केल्यावर सिराजने त्याची पंचांकडे तक्रार केल्यानंतर काही वेळ खेळ थांबला होता. त्या प्रेक्षकांची मैदानातून हकालपट्टी केल्यानंतर खेळ सुरू करण्यात आला. याशिवाय यजमान मंडळानेही या घटनेबाबत भारतीय संघाकडे दिलगिरी व्यक्त केली. या घटनेच्या तपासणीसाठी सीएला आयसीसीकडून आवश्यक ते पूर्ण सहकार्य दिले जाईल, असे आयसीसीने म्हटले आहे. वर्णभेदाला क्रिकेटमध्ये कोणतेही स्थान नाही. काही मूठभर चाहते अशा टिपणीला पाठिंबा मिळेल असा विचार करतात, त्याचे आम्हाला खूप वाईट वाटते. या संदर्भात नियमावली करण्यात आली असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे, असे आयसीसीचे सीईओ मनू साहनी म्हणाले.