ऑस्ट्रेलियातील स्पर्धा लांबणीवर टाकली जाण्याची बीसीसीआयची अपेक्षा
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी कार्यकारिणीची सोमवारी व्हर्च्युअल बैठक होणार असून ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या भवितव्याचा अंतिम निर्णय त्यात घेण्यात येणार आहे. कोरोना प्रकोपामुळे ती रद्द करण्याची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा बीसीसीआयने केली आहे. तसे झाल्यास आयपीएलचा मार्ग मोकळा होणार आहे.
18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विश्वचषक होणार आहे. पण व्हिक्टोरियामध्ये कोव्हिड 19 रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने ऑस्ट्रेलियन मंडळानेच गेल्या मेमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यास असमर्थ असल्याचे म्हटले होते. ही स्पर्धा रद्द व्हावी, अशी अपेक्षा बीसीसीआयनेही केली आहे. कारण याच कालावधीत त्यांना आयपीएल स्पर्धा भरवायची आहे. पण भारतातील स्थितीही चिंताजनक बनली असून दहा लाखाहून अधिक कोरोना रुग्ण वाढले असल्याने त्यांना ही स्पर्धा अन्यत्र घेण्याचा विचार करावा लागत आहे. यासाठी त्यांनी संयुक्त अरब अमिरातची निवड केली असून केंद्र सरकारने परवानगी दिल्यास या वर्षीची आयपीएल यूएईमध्ये आयोजित केली जाईल.
‘आशिया चषक स्पर्धा लांबणीवर टाकणे हे पहिले पाऊल होते आणि ते याआधीच करण्यात आले आहे. आता आयसीसीने टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्यावरच आम्ही पुढील तयारीला लागणार आहोत. यजमान ऑस्ट्रेलियाने विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यास फारसे उत्सुक नसल्याचे याआधीच स्पष्ट केले असूनही आयसीसीने त्याबाबतचा निर्णय लवकर घेण्याचे टाळले होते,’ असे बीसीसीआय अपेक्स कौन्सिलच्या सदस्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.
पुढील वर्षी होणाऱया स्पर्धेची अदलाबदल करण्यास भारताने नकार दिल्याने लांबणीवर टाकली जाणारी ही स्पर्धा आता 2022 मध्ये ऑस्ट्रेलियातच होणार आहे. ऑस्ट्रेलियात सप्टेंबरच्या अखेरीस इंग्लंड संघ दौऱयावर येणार असून या मालिकेची तयारी करण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना सांगितले तेव्हाच विश्वचषक स्पर्धा होणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने 26 खेळाडूंचा प्राथमिक संघही जाहीर केला आहे. असे असताना आयसीसीने मात्र आपण अद्याप अन्य पर्यायांचा विचार करून विश्वचषकाबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची भूमिका घेतली होती. महत्त्वाचे निर्णय घेण्याबाबत आयसीसी नेहमीच अशी चालढकल करीत असते, यात काही नवीन नाही, असेही या सदस्याने सांगितले.
आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी राजीनामा दिला असल्याने या पदाच्या नामांकन प्रक्रियेची चर्चा, हा देखील या बैठकीतील मुख्य मुद्दा असेल. या पदासाठी अनेकांनी उमेदवारी दाखल केली तर कोणते निकष असावेत, याबाबत अजून काहीही ठरविण्यात आलेले नाही. मनोहर यांनी याच महिन्याच्या सुरुवातीस राजीनामा दिल्यानंतर हाँगकाँगचे इम्रान ख्वाजा यांनी अध्यक्षपदाचा हंगामी कार्यभार सांभाळला आहे. या पदासाठी न्यूझीलंडचे गेगॉर बार्कले यांचे नावही संभाव्य उमेदवारात घेतले जात आहे.