दुबई : 2021 सालातील घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या सर्वोत्तम वनडे महिला संघामध्ये भारताच्या मिथाली राज आणि झुलन गोस्वामी यांचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडच्या हिथेर नाईटकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
आयसीसीच्या सर्वोत्तम महिला वनडे संघामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या तीन खेळाडूंचा, ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूचा तसेच विंडीज आणि इंग्लंडच्या प्रत्येकी दोन खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंडच्या नाईटने 2021 च्या कालावधीत 42.30 धावांच्या सरासरीने 423 धावा जमविताना एक शतक आणि तीन अर्धशतके नोंदविली आहेत तसेच तिने गोलंदाजीत 19.80 धावांच्या सरासरीने 5 गडी बाद केले आहेत. भारताच्या 39 वर्षीय झुलन गोस्वामीने 2021 च्या कालावधीत 3.77 धावांच्या सरासरीने 15 गडी बाद केले आहेत तसेच भारताच्या मिथाली राजने फलंदाजीत सातत्य राखल्याने तिचा आयसीसीच्या वनडे महिला संघामध्ये समावेश करण्यात आला आहे.
आयसीसी महिला सर्वोत्तम वनडे संघ 2021 सालातील- लिझेली ली, ऍलीसा हिली, टॅमी बेमाँट, मिथाली राज, हिथेर नाईट (कर्णधार), हेली मॅथ्यूज, मारीझेनी कॅप, शबनिम इस्माईल, फातिमा सेना, झुलन गोस्वामी आणि अनिसा मोहम्मद.