वृत्तसंस्था/ दुबई
2024 ते 2031 या आगामी 8 वर्षाच्या कालावधीत होणाऱया आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धा भरवण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यासह 17 आयसीसी सदस्य देशांनी उत्सुकता दर्शविली आहे. आयसीसी नियंत्रण समितीच्या अहवालामध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात भारतीय क्रिकेट मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये भारताने आयसीसीच्या या आगामी 8 वर्षाच्या कालावधीतील होणाऱया स्पर्धांपैकी 2 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भरवण्याची तयारी दर्शविली आहे. आयसीसीच्या नव्या आंतराष्ट्रीय स्पर्धा कार्यक्रमाच्या कालावधीला 2024 पासून प्रांरभ होईल. 8 वर्षाच्या कालावधीत 50 षटकांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, चॅम्पियन्स करंडक स्पर्धा आणि टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भरवण्यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न चालू आहेत. आयसीसीने आपल्या स्पर्धा कार्यक्रम रुपरेषेमध्ये विस्तारीकरण करण्याचे निश्चित केले आहे. विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम लढत तसेच आयसीसीच्या महिलांच्या आणि 19 वर्षाखालील वयोगटातील स्पर्धांचे या नव्या सायकलमध्ये समावेश करण्यात आला आहे.
2024 ते 2031 या आठ वर्षाच्या आयसीसीच्या स्पर्धा कार्यक्रम सायकलमध्ये पुरुष विभागातील वनडे आणि टी-20 प्रकारातील एकूण 8 स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत. पुरुष विभागातील 2 विश्वचषक स्पर्धा, टी-20 प्रकारातील 4 विश्वचषक स्पर्धा आणि 2 आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धांचा यामध्ये समावेश आहे. या विविध स्पर्धांच्या यजमानपदासाठी आता 17 देशांमध्ये चुरस सुरु आहे. काही देशांनी संयुक्त यजमानपद भूषविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश, आयर्लंड, मलेशिया, नामिबीया, न्यूझीलंड, ओमान, पाकिस्तान, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, विंडीज, संयुक्त अरब अमिरात (युएई), अमेरिका आणि झिंबाब्वे या देशांनी आयसीसीकडे आपले प्राथमिक स्वरुपाचे अर्ज दाखल केले आहेत.
क्रिकेटला इतर क्रीडा प्रकारांच्या तुलनेत संपूर्ण जगात कोटय़वधी शौकीन लाभले आहेत. क्रिकेटला दिवसेंदिवस विविध देशांमध्ये अधिक प्राधान्य मिळत आहे. क्रिकेटमुळे यजमानपद भूषविणाऱया देशांना आर्थिक आणि सामाजिक फायदे मिळत असल्याचे आढळून आले आहे. क्रिकेटमुळे काही देशांमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासाला अधिक चालना मिळाली आहे. आयसीसीच्या या महत्त्वाच्या स्पर्धांचे यजमानपद मिळविण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे आघाडीवर असल्याचे या अहवालात म्हटले आहे.