वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या (आयसीसी) नव्या अध्यक्ष नियुक्तीच्या प्रक्रियेला पुढील आठवडय़ापासून प्रारंभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष भारताचे शशांक मनोहर यांचा कालावधी पुढील आठवडय़ात संपणार आहे.
आयसीसीची बैठक गुरूवारी झाली. या बैठकीमध्ये नव्या अध्यक्षाच्या निवडीच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून उमेदवारीच्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला लवकरच प्रारंभ होत आहे. या बैठकीमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सदर निर्णय पुढील महिन्यात घेतला जाईल, असे संकेत मिळाले आहे. आयसीसीच्या सदस्यांमध्ये काही प्रश्ना संदर्भात मतभेद असल्याचे दिसून आले.
आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी उमेदवाराची निवड एकमताने करण्यात यावी, असा सूर या बैठकीत दिसून आला. आयसीसीच्या आगामी अध्यक्षपदासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे माजी सर्वेसर्वा कॉलीन ग्रेव्हस आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरभ गांगुली इच्छुक असल्याचे समजते.