किवीज संघावर एका गुणाची आघाडी, इंग्लंडचा संघ तिसऱया स्थानावर
दुबई / वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी जाहीर केल्या गेलेल्या ताज्या मानांकन यादीत पुन्हा एकदा अव्वलस्थानी झेप घेतली आहे. भारतीय संघ सध्या नजीकचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंडपेक्षा अवघ्या एका गुणाने आघाडीवर राहिला. विराटसेनेने 24 सामन्यात 2914 गुणांसह 121 ऍग्रिगेट रेटिंग प्राप्त केले तर न्यूझीलंड 120 गुणांसह दुसऱया स्थानी आहे. त्यांच्या खात्यावर 18 कसोटी सामन्यातून 2166 गुण असून येथे त्यांना दोन रेटिंग गुण प्राप्त झाले आहेत. भारत-न्यूझीलंड यांच्यातच पुढील महिन्यात इंग्लिश भूमीत जागतिक विश्व कसोटी चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे.
भारताने मागील वर्षभराच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1, इंग्लंडविरुद्ध 3-1 असे मालिकाविजय संपादन केले तर न्यूझीलंडने विंडीज व पाकिस्तानविरुद्ध 2-0 असे विजय प्राप्त केले आहेत. ताज्या मानांकन यादीत इंग्लंडचा संघ 109 रेटिंगसह तिसऱया स्थानी झेपावला आहे तर ऑस्ट्रेलियाचा संघ (108) आता चौथ्या स्थानी आहे. इंग्लंडने 2017-18 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0-4 असा नामुष्कीजनक पराभव पत्करला होता. तो निकाल ताज्या मानांकन यादीत विचारात घेतला गेला नसल्याने त्यांचे मानांकन आता सुधारले आहे. या यादीत मे 2020 पासूनच्या सर्व मालिकांचा 100 टक्के निकाल विचारात घेतला गेला आहे. त्यापूर्वीच्या 2 वर्षातील कामगिरीची फक्त 50 टक्के नोंद या आकडेवारीत आहे.
पाकिस्तानला या मानांकनात 2 रेटिंग गुण मिळाले. पण, ते 94 गुणांसह पाचव्या स्थानी कायम आहेत. बांगलादेशला 2-0 फरकाने नमवणाऱया व लंकेविरुद्ध शून्य बरोबरी प्राप्त करणाऱया विंडीजने 84 गुणांसह सहाव्या स्थानी झेप घेतली. त्यांचे मानांकन 2 अंकांनी सुधारले. याशिवाय, 2013 नंतरचे त्यांचे हे सर्वोत्तम मानांकन ठरले आहे. दक्षिण आफ्रिका (80), श्रीलंका (78) हे अनुक्रमे सातव्या व आठव्या स्थानी घसरले आहेत. बांगलादेशला (46) या यादीत 5 रेटिंग गुण गमवावे लागले आहेत तर झिम्बाब्वे (35) संघाने 8 गुणांची कमाई केली आहे. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मानांकन यादीतील इतिहासात पुन्हा एकदा निचांकी क्रमवारीशी बरोबरी केली आहे. यापूर्वी देखील ते एकदा सातव्या स्थानी फेकले गेले होते.