दुबई / वृत्तसंस्था
आयसीसी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या नव्या पुरस्कारासाठी आयसीसीने भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत, इंग्लिश कर्णधार जो रुट व आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग यांना नामांकन दिले आहे. वर्षभर प्रत्येक महिन्यात पुरुष व महिला गटासाठी असे स्वतंत्र पुरस्कार दिले जाणार आहेत.
23 वर्षीय ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 कसोटी सामने खेळताना सिडनीत 97 धावांचे योगदान दिले. शिवाय, नंतर ब्रिस्बेनमध्ये नाबाद 89 धावांच्या झुंजार खेळीसह भारताला मालिकाविजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. जानेवारीत रुटने श्रीलंकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यात 228 व 186 धावांची आतषबाजी करत संघाला 2-0 असा एकतर्फी मालिकाविजय मिळवून दिला. या गटातील तिसरा नामांकित आयरिश क्रिकेटपटू स्टर्लिंगने युएईविरुद्ध 2, अफगाणिस्तानविरुद्ध 3 वनडे सामने खेळले व त्यात 3 शतके झळकावली.
महिला गटात पाकिस्तानची डायना बेग, दक्षिण आफ्रिकन जोडी शबनीम इस्माईल, मेरिझेन कॅप्प यांना नामांकन देण्यात आले आहे. सदर पुरस्कारांसाठी अनुभवी पत्रकार, माजी खेळाडू व ब्रॉडकास्टर्स मते देतील आणि आयसीसी हॉल ऑफ फेमचे काही सदस्य प्रामुख्याने विजेते निश्चित करणार आहेत. आयसीसीच्या वेबसाईटवर नोंदणी असलेल्या चाहत्यांसाठी 10 टक्के मते राखून ठेवली जाणार आहेत.