वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनसह इंग्लंडचा कर्णधार जो रूट व विंडीजचा लक्ष वेधून घेणारा नवा फलंदाज काईल मायर्स यांना आयसीसीने महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या बहुमानासाठी नामांकन दिले आहे. फेब्रुवारी महिन्यात या तिघांनी आपापल्या संघासाठी सर्वोत्तम प्रदर्शन केले होते.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अश्विनने तीन कसोटी खेळल्या. त्यापैकी दुसऱया कसोटीच्या दुसऱया डावात त्याने 106 धावांची शतकी खेळी केली आणि अहमदाबादमधील तिसऱया कसोटीत त्याने 400 बळींचा टप्पाही पार केला. ‘तीन सामन्यांत मिळून त्याने एकूण 176 धावा जमविल्या आणि 24 बळीही मिळविले असल्याने या बहुमानासाठी त्याचे नामांकन होणे योग्य ठरते,’ असे आयसीसीने म्हटले आहे. ‘इंग्लंडचा कर्णधार रूटने फलंदाजी व गोलंदाजी दोन्हीत उत्तम प्रदर्शन करीत नामांकनाच्या यादीत स्थान मिळविले आहे. त्याने भारताविरुद्धच्या मालिकेत 333 धावा आणि गोलंदाजीत 6 बळी मिळविले आहेत,’ असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.
विंडीजच्या कसोटी पदार्पण करणाऱया मायर्सने बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी खेळल्या आणि चितगावमधील कसोटीत त्याने 210 धावांची विजयी खेळी करताना 395 धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे या बहुमानाच्या नामांकनास तो पात्र ठरलाय, असे आयसीसीने म्हटले आहे. महिला विभागात इंग्लंडच्या टॅमी ब्युमाँट व नॅट स्किव्हर, न्यूझीलंडची ब्रूक हॅलिडे यांना महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या बहुमानासाठी नामांकन मिळाले आहे.