वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे वनडे वर्ल्ड कप सुपरलीगची क्रमवारी जाहीर करण्यात आली असून ऑस्ट्रेलियाने भारतावर 2-1 असा विजय मिळविल्यानंतर आघाडीचे स्थान मिळविले आहे. या क्रमवारीत भारत सहाव्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका जिंकल्यानंतर त्यांचे 40 गुण झाले आहेत. या गुणांच्या आधारे त्यांनी इंग्लंडला मागे टाकत पहिल्या स्थानावर झेप घेतली. भारताने तिसरा वनडे सामना जिंकत एक गुण मिळविला आणि एकूण 9 गुणांसह या क्रमवारीत सहावे स्थान घेतले आहे. 13 संघांच्या चॅम्पियनशिपमध्ये याआधी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 2-1 अशा फरकाने हरविले होते. आयसीसीने यावर्षीच ही चॅम्पियनशिप क्रमवारी सुरू केली असून 2023 मध्ये भारतात होणाऱया वनडे विश्वचषक स्पर्धेत पहिल्या सात संघांना थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यासाठी त्याची सुरुवात करण्यात आली आहे. भारत या स्पर्धेचा यजमान असल्याने त्यांचा थेट प्रवेश निश्चित आहे. पण भविष्याच्या दृष्टिकोनातून भारताला या क्रमवारीत सुधारणा करण्याची गरज आहे.
विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडचे 30 गुण झाले असून या चॅम्पियनशिपमध्ये झालेल्या सुरुवातीच्याच मालिकेत त्यांनी आयर्लंडवर 2-1 असा विजय मिळविला होता. मात्र नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यांना याच फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानने झिम्बाब्वेवर 2-1 असा विजय मिळवित 20 गुणांवर झेप घेतली आहे तर झिम्बाब्वेचे 10 गुण झाले आहेत. पाकविरुद्धच्या मालिकेतील रावळपिंडीत झालेल्या शेवटच्या सामन्यात त्यांनी सुपरओव्हरमध्ये पाकचा पराभव केला होता.