मुदत पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा देण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांना मंगळवारी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. लेखापरीक्षण करणारी कंपनी प्राईसवॉटरहाऊसकूपर्स अंतर्गत लेखापरीक्षण करत असताना साहनी यांनी त्यांच्याशी केलेली गैरवर्तणूक यासाठी कारणीभूत ठरली असल्याचा ठपका आहे. मनू साहनी यांना यामुळे मुदत पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यांचा कालावधी 2022 पर्यंत आहे.
2019 मधील आयसीसी विश्वचषक स्पर्धा संपन्न झाल्यानंतर मावळते सीईओ डेव्ह रिचर्डसन यांच्याकडून साहनी यांनी पदाची सूत्रे स्वीकारली होती. मात्र, आपल्या बऱयाच धोरणात्मक निर्णयांमुळे त्यांनी बरीच टीका ओढवून घेतली होती. अगदी आयसीसीच्या कर्मचाऱयांनी देखील त्यांच्या गैरवर्तणुकीबद्दल सातत्याने तक्रार केली होती.
56 वर्षीय मनू साहनी मागील काही दिवसांपासून आयसीसी कार्यालयात येत नव्हते. मंगळवारी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले गेले. ‘साहनी यांनी सन्मानपूर्वक आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी फॉर्म्युला ठरवला जात आहे’, असे आयसीसीतील एका सूत्राने नमूद केले.
गतवर्षी आयसीसी अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली, त्या कालावधीपासून साहनी सातत्याने या ना त्या कारणाने सतत वादाच्या भोवऱयात राहिले आहेत. त्यावेळी आयसीसी अध्यक्षपदी गेग बार्कले विराजमान झाले होते.
आश्चर्य म्हणजे साहनी यांनी त्या निवडणुकीसाठी अंतरिम अध्यक्ष इम्रान ख्वाजा यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता व यामुळे काही क्रिकेट मंडळे त्यांच्यावर नाराज होते. पुढील हंगामापासून स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी संबंधित मंडळांनी आयसीसीला शुल्क अदा करावे, असा त्यांचा निर्णय होता, यावर देखील मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती. बीसीसीआय, ईसीबी (इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळ) व क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांनी त्यावर उघडपणे विरोध दर्शवला होता.
राजीनामा दिला नाही तर पुढे काय?
साहनी यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना पदावरुन कमी करण्यासाठी कार्यकारिणीतील 17 पैकी 12 सदस्यांची मते आवश्यक असणार आहेत. यामुळे, बीसीसीआय, ईसीबी व क्रिकेट ऑस्ट्रेलिया ही 12 मते वळवू शकणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. साहनी हे सिंगापूर स्पोर्ट्स हबचे माजी सीईओ राहिले असून ईएसपीएन स्टार स्पोर्ट्स कंपनीसाठी ते 17 वर्षे संचालक राहिले आहेत. मँचेस्टर युनायटेड लिमिटेड कंपनीत ते लेखापरीक्षण समितीचे सदस्य व बिगर-व्यवस्थापकीय संचालक देखील राहिले आहेत.