कोरोना अहवाल मात्र निगेटिव्ह : मृत्यू अन्य आजारामुळे : होम क्वारंटाईन आता 14 ऐवजी 18 दिवसांचे
- कोरोना तपासणीसाठी आणखी दहाजणांचे नमुने मिरजला
- 48 जणांचे कोरोना तपासणी अहवाल प्रतीक्षेत
- जिल्हय़ातील कारागृहांतील कैद्यांची आरोग्य तपासणी
- वृद्धाश्रमातील वृद्धांचीही झाली आरोग्य तपासणी
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मात्र त्या रुग्णाचा कोरोना नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परदेश, परराज्यातून तसेच परजिल्हय़ातून आलेल्या व्यक्तींना 14 ऐवजी आता 28 दिवस ‘होम क्वारंटाईन’ करण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत आणखी दहा कोरोना तपासणी नमुने तपासणीसाठी मिरजला पाठविण्यात आले असून एकूण 48 नमुने तपासणी अहवाल प्राप्त होण्याची प्रतीक्षा आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी येथे दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ाबाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन करण्यात येते. तसेच काही किरकोळ लक्षणे असणाऱयांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येते. कोरोनाची थोडी फार लक्षणे दिसणाऱयांना जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात येते. जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये सध्या 52 रुग्ण उपचाराखाली असून यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. त्या रुग्णाच्या मृत्यूपूर्वी स्वॅबचा नमुना घेऊन तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आला होता. या रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. आयसोलेशनमध्ये दाखल होतानाच या रुग्णाची प्रकृती गंभीर होती. दुसऱयाच दिवशी त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाचा सर्दी, खोकला, ताप किंवा अन्य आजारामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
आता 28 दिवसांचे ‘होम क्वारंटाईन’
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परराज्यातून तसेच परजिल्हय़ातून आलेल्या व्यक्तींना घरीच अलगीकरण म्हणजेच होम क्वारंटाईन करण्यात येते. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात येते. या अलगीकरण काळात 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येऊन या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येत होते. ते आता 28 दिवस केले जाणार आहे. त्यामुळे होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींचे 28 दिवस सर्वेक्षण होणार आहे. आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येते. आता सदरचे सर्वेक्षण हे 28 दिवस करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिल्या आहेत. हे सर्वेक्षण अलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पुढील सलग 14 दिवस करण्यात येणार आहे.
जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये 52 व्यक्ती दाखल असून कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या एकूण नमुन्यांमधून आणखी दोघांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर नव्याने आणखी 10 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आजपर्यंत 154 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 106 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये एकमेव पॉझिटिव्ह रुग्ण वगळता उर्वरित सर्व 105 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेला रुग्ण सुद्धा आता कोरोना मुक्त झालेला आहे. दरम्यान अजूनही 48 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हय़ात आजमितीस 390 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून 52 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 28 दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 213 आहे.
कोविड-19 रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालयाच्या पथकातर्फे जिल्हय़ातील सात वृद्धाश्रमांची तपासणी करण्यात आली. यात एकूण 372 रुग्णांची तपासणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच आश्रमातील वृद्धांची रक्तदाब, मधुमेह तपासणी करून दोन महिन्यांच्या औषधांचा पुरवठा करण्यात आला. जिल्हय़ातील सहा निवारा केंद्रांचीही तपासणी या पथकामार्फत करण्यात आली. त्यामध्ये 101 व्यक्तींची तपासणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. जिल्हय़ातील ओरोस व सावंतवाडी येथील कारागृहातील कैद्यांची तपासणीही करण्यात आली. ओरोस येथील 66 कैद्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील 10 कैद्यांना असलेल्या किरकोळ आजारांवर औषधोपचार करण्यात आले. सावंतवाडी येथील कारागृहातील 60 कैद्यांची तपासणी करून त्यापैकी किरकोळ आजार असलेल्या 17 कैद्यांवर औषधोपचार करण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सध्या जिल्हा रुग्णालयामार्फत डायलेसीसचे सात व केमोथेरपीचा एक रुग्ण सेवा घेत आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत शुक्रवारी 2119 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
घरीच अलगीकरण 0390
संस्थात्मक अलगीकरण 0052
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0154
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0106
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0001
निगेटिव्ह आलेले नमुने 0105
अलवाल प्राप्त न झालेले नमुने 0048
विलगीकरण कक्षात दाखल 0052
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0000
शुक्रवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 2119